अमरावती - एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीस दहा वर्षे सक्तमजुरी, ७ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक ५ पी. एन. राव यांच्या न्यायालयाने सोमवारी हा निर्णय दिला. ही घटना बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत १० मार्च २०१७ रोजी घडली होती. रोशन राजेश पवार (२७, रा. बडनेरा) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
दोषारोपपत्रानुसार,१० मार्च २०१७ रोजी दुपारी पीडित मुलगी ही मैत्रिणीसोबत अंगणात खेळत होती. यावेळी रोशनने तिला केक खायला दिला. त्यानंतर तो पीडित मुलीला घरी घेऊन गेला. त्याने त्याच्या घरी पीडित मुलीचे लैंगिक शोषण केले. त्यामुळे मुलगी रडायला लागली. आवाज ऐकून तिची आत्या रोशनच्या घरी गेली. यावेळी त्यांनी हा धक्कादायक प्रकार बघितला. त्यांनी पीडित मुलीला सोबत घेऊन घरी नेले. त्यानंतर आत्याने घटनेची माहिती पीडित मुलीच्या आईला दिली. त्यामुळे तिची आई रोशनला जाब विचारायला त्याच्या घरी गेली. यावेळी रोशनने त्यांना वाच्यता केल्यास जीवाने मारून टाकेल, अशी धमकी दिली. सायंकाळी पीडित मुलीचे वडील घरी आल्यावर आईने बडनेरा ठाण्यात तक्रार दाखल केली.
पाच साक्षीदार तपासले
तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपासाअंती न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणात न्या. पी. एन. राव यांच्या न्यायालयात पाच साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. साक्षीदारांची साक्ष व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी रोशनला शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सुनील अ. देशमुख यांनी यशस्वी युक्तीवाद केला.