अमरावती - तो तिच्या खिजगणतीतही नव्हता. कहा राजा भोज, और कहा गंगू....अशी गत...तुझ्यात ‘इमोशनल इन्व्हाल्ड’ झाल्याची बतावणी त्याने केली. संवाद वाढला. त्याला वाटले, अरे फसली. मात्र, तो पुढे तिच्यावर संशय घेऊ लागल्याने तिने बोलणं बंद केलं. ती त्याला टाळू लागली. मग काय तर, मंगळवारी सकाळी ९.५५ च्या सुमारास त्याने त्या प्राध्यापक तरूणीची दुचाकी अडविली. माझ्याशी बोल असा हेका धरला. त्यापुर्वी देखील माझ्याशी बोल नाहीतर, मी मरून जाईल अशी धमकी त्याने दिली होती. तो त्रास असह्य झाल्याने अखेर दुपारी एकच्या सुमारास तिने नांदगाव पेठ पोलीस ठाणे गाठले.
पोलिसांनी याप्रकरणी आरोपी शुभम रामदास बायस्कर (२५, ह.मु. गाडगेनगर) याच्याविरूध्द विनयभंग व अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे तक्रारकर्ती तरूणी २७ वर्षांची असून ती एका महाविद्यालयात प्राध्यापक आहे. नांदगाव पेठ पोलिसांनुसार, फिर्यादी व आरोपी शुभम हे एकमेकांना जानेवारी २०२१ पासून ओळखत होते. त्यांच्यात मैत्रीचे संबंध होते. आरोपी हा तिच्यावर नेहमी संशय घ्यायचा. त्यामुळे जून २०२२ पासून तिने आरोपीशी असलेले संबंध पूर्णपणे तोडले. तरीही शुभम हा बोलण्यासाठी तिला जबरदस्ती करीत होता. तू माझ्याशी बोल नाहीतर मी मरून जाईल अशी धमकी देत होता. तसेच तिच्या घरापासून कॉलेजपर्यंत पाठलाग करायचा.
कॉलेजपर्यंत पाठलाग
२७ सप्टेंबर रोजी सकाळी ९.५५ च्या सुमारास प्राध्यापक तरूणी दुचाकीने कॉलेजला जात असताना कठोरा रोडवरील एका इमारतीजवळ आरोपी शुभमने तिची गाडी अडवली व माझ्याशी बोल, असे म्हणाला. पोलिसांच्या माहितीनुसार, त्या तरूणीने त्याच्याकडे ‘त्या’ भावनेतून कधी पाहिलेच नाही. ती केवळ त्याला मित्र समजत होती. मात्र, तिच्याकडून फारसा प्रतिसाद लाभत नसल्याने त्याने तिच्या कुटुंबाशी अटॅचमेंट वाढविली. त्याने काहीदा तिच्याकडून रक्कमही उधार घेतली. मात्र तिच्या मैत्रीपुर्ण संबंधांना त्याने दुसराच अर्थ काढला.
तक्रारकत्या प्राध्यापक तरूणीच्या तक्रारीवरून आरोपीविरूध्द विनयभंग व इतर कलमांन्वये गुन्हा दाखल केला. मंगळवारी सकाळी त्याने तिला रस्त्यात अडवले. तथा बोलण्याचा हेका धरला.
प्रवीण काळे, ठाणेदार, नांदगाव पेठ