चांदूर रेल्वे : कोरोनाचा वाढता प्रसार पाहता संचारबंदी लागू करण्यात आली असून, यात जीवनावश्यक दुकानांना ठराविक वेळ देण्यात आला आहे. मात्र, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चौघांविरुध्द चांदूर रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल केल्याची कारवाई बुधवारी ठाणेदार मगन मेहते यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
कोरोना प्रतिबंधासाठी संचारबंदीत निर्बंध अधिक कडक करण्यात आले असून, जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांची वेळ आता सकाळी ७ ते सकाळी ११ अशी झालेली आहे. तसा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी जारी केला. परंतु, तरीही काही भाजीपाला, फळविक्रीची दुकाने वेळेनंतरही सुरू राहत असून ज्यांना परवानगी नाही, अशीही काही दुकाने सुरू राहत आहे. त्यामुळे आता चांदूर रेल्वे पोलिसांकडून धडक कारवाई मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये बुधवारी अनिल नारायण फरकुंडे रा. डागंरीपुरा, शुभम विठ्ठलराव हटवार (रा. डांगरीपुरा), सूरज प्रकाशराव खिरडकर (रा. मेहरबाबानगर) व श्रीराम हनुमानप्रसाद दुबे (रा. राम मंदिरजवळ या चौघांविरूध्द नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भादंविचे कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई ठाणेदार मगन मेहते यांच्या मार्गदर्शनात एपीआय विक्रांत पाटील, राऊत, पीएसआय गणेश मुपडे, पोलीस कर्मचारी शिवाजी घुगे, विनोद वासेकर, जगदीश राठोड, अरुण भुरकाडे, उमाळे यांनी केली.
सात दुकानदारांकडून ४ हजारांचा दंड वसूल
बुधवारी पोलीस विभाग व नगर परिषदेकडून संयुक्तरीत्या दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात ६ भाजीपाला - फळ विक्रेत्यांकडून ३ हजारांचा व एका दुकानदाराकडून १ हजार असा एकूण ४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. या कारवाईत ठाणेदार मगन मेहते, वाहतूक पोलीस कर्मचारी भूषण वंजारी व इतर पोलीस कर्मचारी, नगर पालिका कर्मचारी राहुल इमले, जितेंद्र कर्से, राजेश शिर्के, सुभाष डोंगरे आदींचा सहभाग होता.
भर मार्केटमध्ये वाद
बुधवारी दुकाने बंद करण्याची वेळ झाल्यानंतर मानकानी बंधू व मोटवानी बंधू या व्यापाऱ्यांमध्ये चांदूर रेल्वे शहरातील मुख्य मार्केटमध्ये आपसी कारणावरून वाद निर्माण झाला होता. पोलीस घटनास्थळी पोहचल्यानंतरही हा वाद सुरूच होता. यावेळी मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे पोलिसांनी दोन मोटवानी बंधू व दोन मानकानी बंधू अशा चौघांविरुध्द भादंविचे कलम १६०, १८८ अन्वये गुन्हा दाखल केला.