फोटो पी २० खडसे
अनिल कडू
परतवाडा : सार्वजनिक बांधकाम उपविभाग, अचलपूरमधील सेवानिवृत्त कर्मचारी व प्रहारचे ज्येष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी प्रकाश ऊर्फ बाळासाहेब खडसे यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या तिघांविरुद्ध परतवाडा पोलिसांनी भादंविचे कलम ३०६ व ३४ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. प्रकाश खडसे यांनी १७ एप्रिल रोजी पहाटे गौरखेडा शेतशिवारात आत्महत्या केली होती.
मृत प्रकाश खडसे यांच्या भावाने याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. या तक्रारीत पुणे येथील नीलिमा संजय पीटर, अँथनी यादव पवार व संजय एस. पीटर या तिघांची नावे देण्यात आली आहेत. या तिघांची नावे प्रकाश खडसे यांनी मृत्यूपूर्व लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतही नमूद असल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या तिघांविरुद्ध कारवाई करून न्याय देण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे. प्रकाश खडसे यांनी लिहिलेली मृत्यूपूर्व चिठ्ठी राज्यमंत्री बच्चू कडू व ठाणेदार यांच्या नावे लिहिली आहे.
आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी त्या चिठ्ठीत म्हटले आहे. पोलिसांनी अजूनही ती चिठ्ठी सार्वजनिक केलेली नाही. आपल्या जवळच्या नातेवाईकाला नोकरी मिळावी म्हणून प्रकाश खडसे यांनी पुणे येथील या तिघांकडे तब्बल दहा लाख दिले होते. हे तिघे एका राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. त्यांनी संबंधितास नोकरी लावून दिली नाही आणि पैसेही परत केले नाहीत. खडसे यांनी आत्महत्येपूर्वी त्यांच्याकडे अनेकदा पैसे परत करण्याची अनेकदा विनंती केली. यातच ते मानसिक तणावात आल्याची सूत्रांची माहिती आहे.
बॉक्स
थकीत कर्जापोटी एका राष्ट्रीयीकृत बँकेकडून त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली होती. यात थकीत कर्जाचे हप्ते भरण्यास त्या बँकेने खडसे यांना सुचविले होते. बँकेकडून घेतलेले कर्ज आणि खाजगी व्यक्तींकडील पैसे मिळून जवळपास २५ लाखांच्या आर्थिक विवंचनेत खडसे अडकले होते, अशी माहिती आहे.
कोट
आर्थिक विवंचनेतून खडसे यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीत पुणे येथील तिघांची नावे नमूद आहेत. या तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
- सदानंद मानकर, ठाणेदार, परतवाडा