अमरावती: सन २०१८ पासून गुन्हेगारीत शिरकाव केलेल्या व पोलिस दप्तरी कुख्यात म्हणून नोंद असलेल्या यश सुनिल कडू (२४, रा. मेहरबाबा कॉलनी, जेवड नगर, अमरावती) याच्याविरूध्द ‘एमपीडीए’ अन्वये कारवाई करून त्याला वर्षभरासाठी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे. राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिनाभराच्या अंतराने झालेल्या दोन खुनांच्या पाश्वभूमिवर कुख्यात यश कडूला वर्षभरासाठी तुरूंगात धाडण्यात आले. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी २३ ऑगस्ट रोजी ते आदेश काढले.
तीन दिवसांपुर्वी यश रोडगे (१८, गोपालनगर) याचे अपहरण करून टोळीयुध्दातून खून करण्यात आला. त्याअनुषंगाने अवघ्या एका दिवसांत यश कडूविरूध्द एमपीडीएची कारवाई करण्यात आली. कुख्यात यश कडू याच्याविरूध्द राजापेठ, फ्रेजरपुरा, सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात घातक हत्यारांनी ईच्छा पुर्वक जबर दुखापत करणे, हाफमर्डर, प्राणघातक हत्यारानिशी सज्ज होऊन दंगा करणे, गृह अतिक्रमण करणे, मृत्यू किंवा जबर दुखापत घडवुन आणण्याचा प्रयत्नासहीत जबरी चोरी किंवा दरोडा, ॲट्रासिटी, अग्निशस्त्र व अवैध शस्त्र बाळगणे, अधिसुचनांचे उलघंन करणे, हद्दपार आदेशाचे उल्लघंन असे गंभीर स्वरूपाचे एकुण १६ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापुर्वी प्रतिबंधक कारवई करण्यात आली. तसेच त्याला तडीपार सुध्दा करण्यात आले होते. तरी सुध्दा तो गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय असल्याने त्याच्याविरूध्द एमडीपीए अन्वये कारवाईचा प्रस्ताव राजापेठचे ठाणेदार महेंद्र आंभोरे यांनी आयुक्तालयात पाठविला. गुन्हे शाखेचे निरिक्षक गोरखनाथ जाधव व एमपीडीए सेलमार्फत त्या प्रस्तावाची पुर्तता करण्यात आली. त्याआधारे पोलीस आयुक्त नविनचंद रेड्डी यांनी २३ ऑगस्ट रोजी आदेश पारित केले. तथा राजापेठ ठाणेदारामार्फत त्याला स्थानबध्दतेच्या कालावधीकरीता जिल्हा मध्यवर्ती कारागृहात देखील हलविण्यात आले.