नगरपालिकेला जाग : परतवाड्यात मोकाट गुरे पकडण्याची मोहीम नरेंद्र जावरे परतवाडा शहरातील अत्यंत वर्दळीच्या मार्गावर रात्रंदिवस ठाण मांडून बसणाऱ्या मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिका प्रशासनाने तीव्र केली आहे. गुरे मोकाट सोडल्यास फौजदारी कारवाईचा इशारा दिला आहे. शहरातील जयस्तंभ चौक, दुर्राणी चौक, पालिका कार्यालय, गुजरी बाजार, अमरावती-इंदूर या राज्य महामार्गावर गुरांचा ठिय्या वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा ठरत होता. या मार्गावर वेगवेगळ्या अपघातांमध्ये चारजणांना जीव गमवावा लागला. आता पुन्हा रस्त्यावरच गुरांनी बस्तान मांडल्याने दुचाकीसह पादचाऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे. मोकाट गुरांना नगरपालिका कर्मचाऱ्यांनी कोंडवाड्यात नेऊन कोंडण्याचा प्रकार आठवडाभरापासून आरोग्य सभापती राजू लोहिया यांच्या नेतृत्वात सुरू आहे. मात्र दोन दिवस पशुपालक आपली गुरे कोंडवाड्यातून सोडवून पुन्हा मोकाट सोडून देत आहे. परिणामी परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. बुधवारी पहाटे ७ वाजतापासून मुख्याधिकारी प्रदीप जगताप, आरोग्य सभापती राजू लोहिया, आरोग्य निरीक्षक मुंजावर यांच्यासह जवळपास पन्नास कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेसह मोकाट गुरांना कोंडवाड्यात नेण्याचा कार्यक्रम राबविला. पुन्हा रस्त्यावर गुरे आढळली की, त्यांच्यावर फौजदारी कारवाईच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरांना नेताना परतवाडा पोलिसात पुन्हा गुरे मोकाट सोडणार नसल्याचे हमीपत्रसुद्धा लिहून घेतले जाणार आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा मोकाट गुरांना सोडून पशुपालकांनी सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ चालविला आहे. वारंवार सूचना देऊनसुद्धा त्यांच्यावर कुठलाच फरक पडत नसल्याने गुरांमुळे महामार्ग किंवा शहरातील अंतर्गत मार्गावर अपघात झाल्यास या मोकाट गुरांच्या पशुपालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आता जुळ्या शहरात होत आहे.
पशुपालकांवर थेट फौजदारी गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2016 12:18 AM