गुप्तहेर लागले कामाला : जिल्हाधिकारी, सीपी, एसपींना पालकमंत्र्यांचे आदेशअमरावती : शेतकऱ्यांच्या नावाआड व्यापारी त्यांची तूर विक्री करीत असल्याची गंभीर बाब लक्षात आल्यानंतर खरेदी केंद्रांवरील असे व्यापारी हुडकून काढून त्यांच्यावर विनाविलंब फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी बुधवारी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वातील हे शासन शेतकरी हितासाठी कटीबद्ध असल्याचे स्पष्ट करून शेतकऱ्यांवर अन्याय आणि व्यापाऱ्यांची दादागिरी कदापि खपवून घेतली जाणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत ना.पोटे यांनी प्रशासनाची कानउघाडणी केली. पालकमंत्र्यांच्या या आदेशानंतर लागलीच शहर आणि ग्रामीण पोलिसांची गुप्तचर यंत्रणा आणि जिल्हाधिकाऱ्यांची विशेष चमू तूर खरेदी केंद्रांवरील घडामोडींवर नजर ठेवून आहेत. यंदा तुरीचे विक्रमी उत्पादन झाले. त्यामुळे भाव गडगडले. शेतकऱ्यांना किमान हमी भाव मिळावा यासाठी शासनाने खरेदी केंद्र सुरू केलेत. केंद्रांवर सुविधाउपलब्ध कराअमरावती : शेतकऱ्यांची पिळवणूक कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही. शासकीय तूर खरेदी केंद्रात शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून त्यांच्या कृषी मालाची योग्य ती काळजी घ्या. तूर मोजणीसाठी मुबलक बारदाना उपलब्ध ठेवा, खरेदी केंद्रावर मोजणीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांना ताटकळत बसावे लागता कामा नये, अधिक प्रमाणात वजनमापे उपलब्ध करा, बाजार समितीत शेतकऱ्यांची अवहेलना होत असल्यास तात्काळ कारवाई करा, असे आदेश पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना दिलेत. पालकमंत्र्यांच्या या आदेशानंतर प्रशासन विशेष सतर्क झाले आहे. भंडाऱ्यातून बुधवारी पोहोचला बारदानाबारदाना नसल्याच्या क्षुल्लक कारणाने तूर खरेदी थांबविल्याची बाब पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी गांभीर्याने घेतली. यासाठी जिल्ह्यात एक लाख बारदाना भंडारा येथून मागविण्यात आला असून तत्काळ तुरीची खरेदी सुरू करावी व खरेदी केंद्रात कुठलीही अडचण अथवा साधनसामुग्रीचा अभाव असल्यास जिल्हा प्रशासनाला तत्काळ कळवावे, अशा सूचना देखील त्यांनी केल्यात.पोलिसांसह ‘महसूल’ करणार शहानिशाशासकीय तूर खरेदी केंद्रांवर विक्रीसाठी येणारी तूर शेतकऱ्यांची की व्यापाऱ्यांची, याची पडताळणी स्थानिक पोलिसांच्या गुप्तचर विभागाने आणि महसूल यंत्रणेने करावी, असे निर्देश पालकमंत्री पोटे यांनी दिलेत. त्यानुसार बुधवारी अमरावती येथील केंद्रावर पथकाने तूर मालाची चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.सातबाऱ्यावरील नोंदीनुसार उत्पादनाची पडताळणी जिल्ह्यात यंदा तुरीची उत्पादकता एकरी पाच ते सहा क्विंटल असल्याचा अंदाज आहे. त्यानुसार सातबाऱ्यावरील तूरपिकाच्या क्षेत्राची नोंद व प्रत्यक्षात विक्रीला आणलेला माल याची सांगड घालून पडताळणी करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. याव्यतिरिक्त माल आढळल्यास त्याची चौकशी केली जाणार आहे. बुधवारपासून मार्केटयार्डात यंत्रणांचा ‘वॉच’जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षक या शासनाच्या महत्त्वाच्या संवेदनशील यंत्रणा आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नावावर आणली जाणारी व्यापाऱ्यांची तूर हुडकून काढण्याचे निर्देश या यंत्रणेला देण्यात आलेत. त्यानुसार बुधवारपासून याची शहनिशा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांचा हक्क हिरावणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे
By admin | Published: April 13, 2017 12:05 AM