गतवर्षापासून कोरोना व्हायरस या आजाराने आगमन केल्यामुळे सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे अनेक छोटे व्यावसायिक आपल्या व्यवसायाला मुकले. उदरनिर्वाहाचे संकट उभे ठाकल्याने अनेक व्यावसायिकांनी मिळेल ते काम करण्याचे चंग बांधला व ते आपल्या संसाराच्या गाड्याला हातभार लावण्यासाठी काम करीत आहेत. परंतु, गव्हा निपाणी येथील रहिवासी नंदकिशोर खडसे यांच्याकडे दोन घोडे असून, उन्हाळ्याच्या लग्नसराईमध्ये ते आपल्या घोड्यांना सजवून, त्यावर नवरदेवाला बसवून वरात काढत होते. परंतु, गतवर्षीपासून लग्नकार्य बंद असल्याने व्यवसाय तोट्यात आला. परिणामी संसाराचा गाडा चालविणे कठीण होऊन बसल्याचे खडसे यांनी यावेळी सांगितले.
लग्नसराईमध्ये साधारणत एका घोड्याची कमाई दोन लाखांच्या आसपास होते. त्यामुळे संसाराचा गाडा सुरळीत चालत होता. मात्र कोरोनाव्हायरस मुळे जगण्याचे वांदे झाल्याचे त्यांनी सांगितले. घरी शेती नसल्यामुळे चारा शेतकऱ्यांकडून खरेदी करावा लागतो. एका घोड्याला वर्षाकाठी किमान ३० ते ४० हजार रुपयांचा खर्च येतो. परंतु, आता कामच नसल्याने घोड्यांना व आम्हा जगण्याचे कठीण दिवस आले आहेत. सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नंदकिशोर खडसे यांनी सदर प्रतिनिधीशी बोलताना केले.
घरीच चारापाणी
गतवर्षापासून घोड्यांना कोणतेही काम नसले तरी त्यांचे पोट भरण्यासाठी त्यांच्यासाठी खाद्य खरेदी करून घ्यावे लागते. लग्न समारंभ बंद असल्याने या घोड्यांना घरीच चारापाणी करावे लागत असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.