आईची न्यायासाठी पायपीठ : फे्रजरपुरा पोलिसांची चौकशी संशयास्पदअमरावती : मुलीच्या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या दोन युवकांना फे्रजरपुरा पोलिसांचे अभय दिल्यामुळे तिची आई न्यायासाठी फे्रजरपुरा पोलीस ठाण्याचे उंबरठे झिझवीत आहे. मृताच्या आईने दोन्ही युवकाचा नामोउल्लेख केलेली तक्रार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह फे्रजरपुरा ठाण्यात दिली आहे. मात्र, अद्यापही पोलिसांनी त्या युवकांवर कारवाई न केल्याने पोलिसांच्या भूमिकेवरही संशय निर्माण केला आहे. नारायण नगरातील रहिवासी ज्योती शंकर सदाफळे यांची मुलगी नेहा ऊर्फ पूनम हिने ३० नोव्हेंबर २०१५ रोजी आत्महत्या केली. तिचे हार्दिक पिंगळे या युवकाशी प्रेमसंबंध होते, मात्र, किशोरनगरातील अमित तायडे व राहुल ठाकरे या दोंघानी हार्दिकला पूनमच्या चारित्र्याविषयी चुकीच्या माहिती दिली होती. त्यामुळे हार्दिकने पूनमशी लग्न करण्यास नकार दिला. लग्नास नकार देताच पूनमने आत्महत्या केली. मात्र, हार्दिकने नकार का दिला, त्याचे निश्चित कारण शोधण्याचा प्रयत्नही पोलिसांनी केला नाही. पूनमची आई ज्योती सदाफळे यांच्या तक्रारीवरून फे्रजरपुरा पोलिसांनी हार्दिक पिंगळेविरूध्द गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. मात्र, चोर सोडून सन्यास्याला फाशी दिल्याची भूमिका पोलिसांची असल्याचे मत पूनमच्या आईचे होते. पूनमचा प्रियकर हार्दिक आपल्या मुलीशी लग्न करणार आहे, ही माहिती आई-वडिलांना होती. हार्दिकचाही लग्नासाठी होकार होता. मात्र, दरम्यान किशोर नगरातील रहिवासी अमित तायडे व राहुल प्रल्हाद ठाकरे या दोन युवकाने हार्दिकच्या मोबाईल एसएमएस व फोनवर संवाद साधून पूनमच्या चारित्र्याबद्दल चुकीची माहिती दिली. त्यामुळे हार्दिकच्या मनात पूनमबाबत गैरसमज व संशय निर्माण झाला. परिणामी हार्दिकने लग्नास नकार दिला. हा धक्का पूनमला सहन न झाल्याने तिने आत्महत्या केली. पूनम हिच्या आत्महत्येस हार्दिक जितका जबाबदार आहे, त्यापेक्षा तिचे लग्न मोडण्याचे कटकारस्थान करणारे अमित तायडे व राहुल ठाकरे हेदेखील तितकेच दोषी आहेत. त्यामुळे पोलिसांनी दोषी युवकांवरही कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, तसे न होता पोलिसांनी या दोघांनाही अभय दिल्याचा आरोप पूनमच्या आईचा आहे. मुलगी गेल्याच्या दु:खात असताना पोलिसांनी ज्योती सदाफळे यांचे बयाण घेतले. त्यावेळी अमित व राहुल यांचे नाव तक्रारीत आले नव्हते, मात्र, आता ज्योती सदाफळे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात पुन्हा तक्रार नोंदविली असून त्यामध्ये अमित तायडे व राहुल ठाकरे यांच्याविरुध्द तक्रार केली आहे. मात्र, तरीसुध्दा पोलिसांनी आरोपींना अटक केली नाही. त्यामुळे पूमनच्या मृत्यूस कारणीभूत असणारे ते दोन्ही युवक मोकाटच फिरत आहेत. पूनमची आई न्यायासाठी फे्रजरपुरा पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवीत आहे, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. (प्रतिनिधी)
मुलीच्या आत्महत्येस कारणीभूत असणारे मोकाटच
By admin | Published: January 16, 2016 12:27 AM