अमरावती : प्रधानमंत्री पीक विमा योजना कितीही चांगली असली तरी कंपन्याच्या मनमानी कारभारामुळे डागाळली आहे. यंदापासून केवळ एक रुपयात शेतकऱ्यांना सहभाग घेता येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उच्चांकी सहभाग लाभत आहे. यामध्ये रब्बी हंगामासाठी १५ डिसेंबर ही डेडलाइन होती. यामध्ये उच्चांकी ६२,३१३ शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदविलेला आहे. त्या तुलनेत गतवर्षी ७ हजार सहभाग होता.
आठ दिवसांपूर्वी योजनेत २४ हजार शेतकरी सहभाग होता. त्यामुळे शेवटच्या आठवड्यात तब्बल ३८ हजार शेतकरी योजनेत सहभागी झाले आहेत. रब्बी पेरणी ते काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आपत्ती, आग, गारपीटसारख्या धोक्यांपासून पिकांना संरक्षण मिळते. त्यातही शेतकऱ्यांवर कुठलाच आर्थिक भार नसल्याने योजनेत शत-प्रतिशत शेतकरी सहभागी होत आहेत.