अमरावती : जिल्ह्यात ७ व ९ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे नऊ तालुक्यातील ५२० गावे बाधित झाली. यात ३३,०९९ हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला सादर केला.
सप्टेंबर महिन्यात सातत्याने पाऊस सुरूच आहे. ७ व ९ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, नांदगाव खंडेश्वर, अमरावती, भातकुली, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, तिवसा व धामणगाव रेल्वे तालुक्यातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यामध्ये मूग, उडीद, सोयाबीन, कापूस व तूर पिकांचा समावेश आहे. जिल्हा अधीक्षक कृषी विभागाच्या माहितीनुसार, ३३ हजार हेक्टरवर क्षेत्रात हे नुकसान झालेले आाहे. महसूल विभागाच्या प्राथमिक अहवालात १० हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचे दर्शविण्यात आलेले होते.
यामध्ये अंजनगाव सुर्जी तालुक्यात २९ गावांमध्ये ७०० हेक्टर, दर्यापूर तालुक्यात ९० गावांमध्ये ८४८ हेक्टर, अमरावती तालुक्यात ७९ गावांमध्ये १३ हजार हेक्टर, भातकुली तालुक्यात ९८ गावांमध्ये ३,८२१ हेक्टर, चांदूर बाजार तालुक्यात एका गावात ३८ हेक्टर, चांदूर रेल्वे तालुक्यात ५७ गावांमध्ये २,४७५ हेक्टर, तिवसा तालुक्यात ६० गावांमध्ये १,३१३ हेक्टर व धामणगाव रेल्वे तालुक्यात ८१ गावाममध्ये २,८५१ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झालेले आहे.
बॉक्स
१,९३८८ घरांची पडझड, १.५१ कोटींची मागणी
या अतिवृष्टीमध्ये १९३८ घरांची पडझड झालेली आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाने १,५१,४९,१०१ रुपयांची मागणी शासनाकडे केलेली आहे. याशिवाय ९४ पशुधनाची हानी झालेली आहे. याकरिता ३,२८,१०० रुपयांची मागणी नोंदविण्यात आलेली आहे. याशिवाय यंदाच्या पावसाळ्यासह एप्रिल व मे महिन्यातील अवकाळीमुळे ३,५८८ घरांचे नुकसान झालेले आहे. याकरिता २.६७ कोटींची मागणी जिल्हा प्रशासनाने केलेली आहे.