अमरावती : शनिवारी पहाटे वीज,वादळासह झालेल्या पावसाने किमान १०० हेक्टरमधील गहू, हरभरा व संत्रा पिकाचे नुकसान झाले. याशिवाय वीज कोसळल्याने चांदूर रेल्वे तालुक्यात दोन गाईंचा मृत्यू झाला, तर अचलपुरात दोन घरांचे अंशत: नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
जिल्ह्यात चार दिवसांपासून अवकाळीचे संकट आहे, अजून चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले. अवकाळीच्या शक्यतेने काढणीला आलेल्या गहू, हरभऱ्याची सवंगणी व मळणी केल्याने बहुतांश शेतकरी या संकटातून बचावले आहेत. तरीही उशिरा पेरणी झालेला गहू, हरभऱ्याला याचा फटका बसला. याशिवाय संत्रा, लिंबूची फळगळ झाल्याचे दिसून येते.
जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार, चांदूर रेल्वे तालुक्यात पळसखेड शिवारात रात्री वादळासह झालेली गारपीट व पावसाने काढणीला आलेला गहू जमीनदोस्त झाला व हरभऱ्याचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाचा घास हिरावला गेल्या आहे. याशिवाय तालुक्यात वीज अंगावर पडल्याने दोन गाई दगावल्या व अचलपूर तालुक्यात दोन घरांची पडझड झालेली असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके यांनी सांगितले.