अमरावती जिल्ह्यात मंगळवारी जोरदार वादळासह झालेल्या अवकाळीने चार तालुक्यांतील ४२८४ हेक्टरमधील गहू, कांदा व संत्र्याचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय ५१ घरांची व एका गोठ्याची पडझड झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे.
जिल्ह्यात २ मे रोजी सरासरी ९.४ मिमी अवकाळी पावसाची नोंद झाली; मात्र वादळाने जास्त नुकसान झालेले आहे. यामध्ये सर्वाधिक ४१५० हेक्टरमधील कांदा व संत्र्याचे नुकसान मोर्शी तालुक्यात झालेले आहे. याशिवाय अचलपूर तालुक्यात १०७.२७ हेक्टर, दर्यापूर २३ हेक्टर, भातकुली ३.९२ हेक्टरमधील गहू व कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. यामध्ये ३३ टक्क्यांवर बाधित पिकांचे पंचनामे करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.