तपासाला गती : घर-शेतीची पोलिसांद्वारे पाहणी अमरावती : जिल्ह्यातील ६०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेपासून वंचित ठेवणाऱ्या महादेव कुबडे या पेढीधारकाच्या फौजदारी प्रकरणात बुधवारी कोतवाली पोलिसांनी अरोहन कुबडेचे बयाण नोंदविले. कुबडेच्या घरी व शेतशिवारात जाऊन पोलिसांनी विजय कुबडेचा शोध घेतला. मात्र, ते पसार झाल्याचे आढळून आले आहे. परवानाधारक सावकार महादेव कुबडे यापेढीचे प्रोप्रायटर विजय कुबडे यांचा आरोहन हा मुलगा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. १२ जानेवारीला महादेव कुबडे या सावकारीपेढीविरूद्ध फौजदारी आणि महाराष्ट्र सावकारी (नियमन) कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हे नोंदविल्यानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. तपासादरम्यान तपास अधिकारी पीएसआय गोकूल ठाकूर व त्यांचे पथक दुपारी कुबडे ज्वेलर्समध्ये पोहोचले.‘सावकार बजाव’ आंदोलनाचा इशाराअमरावती : तेथे त्यांनी सावकारीसंदर्भातील दस्तऐवज तपासून आरोहन कुबडेची चौकशी केली व त्याचे बयाण नोंदविले. पसार विजय कुबडेबाबतही कसून चौकशी केली. तुर्तास विजय कुबडे पसार असून त्याच्या मागावर खबरे सोडण्यात आले आहेत. दरम्यान कोतवाली पोलिसांनी कुबडेच्या विविध मालमत्तांच्या ठिकाणांचा शोध घेऊन तेथील झडती घेतली. त्याअनुषंगाने बुधवारी काँग्रेसनगरस्थित कुबडेचे निवासस्थान आणि रहाटगाव परिसरातील शेतशिवारातही पोलीस पथक पाठविण्यात आले होते. मात्र, विजय कुबडे सापडला नाही. कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या सावकारांवर कारवाई करा, अन्यथा ‘शेतकरी बचाव, सावकार बजाव’ आंदोलन सुरू करण्याचा इशारा नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सातरगावातील रहिवासी मनीष जाधव (पाटील) यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी बुधवारी सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधकांना निवेदन सादर केले आहे. अटकपूर्व जामीन अर्ज सावकारी गोरखधंद्यातील आरोपी विजय कुबडे यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केल्याची माहिती पोलीससूत्रांनी दिली. पोलिसांनी न्यायालय परिसरात विजय कुबडेला अटक करण्यासाठी सापळा रचला होता. मात्र,त्याने पोलिसांच्या हातीवर तुरी दिल्या होत्या. अटकपूर्व जामिनावर १९ जानेवारीला सुनावणी होणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
आरोहन कुबडेचे बयाण नोंदविले
By admin | Published: January 19, 2017 12:05 AM