अतिरिक्त ताण पडत असल्याने आरोग्य यंत्रणाच आजारी पडण्याची शक्यता
वरूड : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता येथील तालुका आरोग्य कार्यालयात दिवसागणिक ३०० ते ३५० नागरिकांची आरटीपीसीआर चाचण्या केली जात आहे. तालुक्यात दिवसाकाठी ६० ते ७० रुग्ण पॉझिटिव्ह निघत असल्याने चिंताजनक स्थिती आहे.
अनेक आरोग्य कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने रजेवर आहेत. आरोग्य यंत्रणाच आजारी पडण्याची भीती व्यक्त होत आहे. राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. शासकीय किंवा खासगीतसुद्धा बेड मिळत नाही. यामुळे शेकडो कोरोनाग्रस्त घरीच विलगीकरण करून उपचार घेत आहे. परंतु घरातच विलगीकरण करीत असताना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे एका सोबत घरातील उर्वरित सदस्य सुद्धा बाधित होत असल्याने चिंतेचा विषय झाला आहे. वरूड तालुका राज्याचे आणि जिल्ह्याचे शेवटचे टोक असून मध्यप्रदेश सीमा १२ किमी तर करवार वर्धा नाका २२ किमी आहे.
मध्यप्रदेश सरकारने कठोर नाकाबंदीतून कुणालाही सूट दिलेली नाही. आरटीपीसीआर निगेटिव्ह असल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. यामुळे प्रवाशांना १२ ते २२ किमीचा विनाकारण फटका पडतो. हेच प्रवाशी वरूडला कोविड चाचणी करून घेतात. यामुळे कोरोना चाचणी करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊन याचा ताण आरोग्य यंत्रणेवर पडत आहे. दरदिवसाला ३०० ते ३५० चाचण्या केल्या जात असून यातून ५० ते ७० किंवा त्यापेक्षाही अधिक रुग्ण पॉझिटिव्ह निघत आहे. वरूड दोन कोविड चाचणी केंद्र असून दोन्ही ठिकाणी नागरिकांची रांगच रांग असते.