फोटो - टेंभूरखेडा २२ पी
टेंभूरखेडा : नजीकच्या गव्हाणकुंड येथील कपिलेश्वर देवस्थानात श्रावण सोमवारी जनसागर उसळणार आहे. निसर्गनिर्मित भुयार व शिवलिंगाची पूजा आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी अनेक भाविकांची मांदियाळी कपिलेश्वर देवस्थानात उसळणार आहे. वरूड तालुक्याच्या ठिकाणापासून १० किलोमीटर अंतरावरील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले कपिलेश्वर देवस्थान येथील भुयारात खडकाचे अनेक स्तर आहेत. या भुयारात शिवलिंगसुद्धा आहे. येथील शिवलिंगावर खडकातून सतत पाणी झिरपत असते. या अलौकिक नैसर्गिक क्रियेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये या जागेबद्दल अनन्यसाधारण महत्त्व आहे.
कपिलेश्वर महादेव देवस्थानाला मोठी ऐतिहासिक व धार्मिक परंपरा आहे. गव्हाणकुंड येथील लक्ष्मण पाटील यांना कपिल ऋषींनी स्वप्नात दृष्टांत दिला होता. लक्ष्मण पाटील यांनी स्वप्नातील जागेचा शोध घेतला तेव्हा त्यांना बुजलेल्या भुयाराच्या ढिगाऱ्यात शिवलिंग आढळले. यालाच अमृतकुंड म्हणतात. भुयारात खडकाचे निमुळते झालेले अनेक स्तर आहेत. त्यातुन सतत पाणी ठिबकत असते. गव्हाणकुंड येथील भुयार सालबर्डी येथील सुप्रसिद्ध भुयारापर्यंत आतून जोडले असल्याची आख्यायिका आहे. कारण गव्हाणकुंड भुयारातून लोकांनी सोडलेल्या २० बकऱ्यांपैकी एक सालबर्डी येथील भुयारामधून बाहेर पडल्याचे सांगण्यात येते.
सात नैसर्गिक कुंड
देवस्थान परिसरात पाण्याचे सात नैसर्गिक कुंड आहेत. त्यांना म्हैस कुंड, नंदी कुंड, माणूस कुुंड, विहीर कुंड, पाखर कुंड, ताबूत कुंड व अप्सरा कुंड अशी नावे आहेत. या निसर्गरम्य कपिलेश्वर महादेव देवस्थानात महाशिवरात्रीला मोठा यात्रा महोत्सव असतो. तथापि, कोरोनामुळे आता आयोजनच झालेले नाही.
विद्युत सुविधा
भुयारात पूर्वीपेक्षा मोठ्या प्रमाणात सुविधा करण्यात आल्या आहेत. यासाठी अध्यक्ष ............... यांनी पुढाकार घेतला आहे. विजेचीसुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय इतर दिवशीदेखील याठिकाणी भाविक भक्तांची मांदियाळी असते.