लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना संसर्गाचा परिणाम आणि कडक लॉकडाऊनमुळे अमरावती - मुंबई एक्स्प्रेस १० मेपर्यंत रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे २७ एप्रिलपासून दरराेज १२५ ते १५० आरक्षण तिकीट रद्द होत असून, रेल्वेने अंदाजे पावणे दोन लाख रूपये प्रवाशांना परत दिले आहेत. मात्र, ज्या प्रवाशांनी ई-तिकीट बुकिंग केले आहे, त्यांना रेल्वे खिडक्यांवर रक्कम परत दिली जात नाही, अशी माहिती आहे.
अमरावती - मुंबई एक्सप्रेस दिनांक २७ एप्रिल ते १० मे दरम्यान १४ दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईला ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी आता बुकिंग केलेले आरक्षण तिकीट रद्द करण्याचा सपाटा चालवला आहे. लॉकडाऊनमुळे मुंबई एक्सप्रेसचे बुकिंग कमी झाल्यामुळे १४ दिवस मुंबई एक्स्प्रेस बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मुंबईमार्गे ये-जा करण्यासाठी पश्चिम विदर्भात रेल्वे प्रवाशांच्या पसंतीला खरी उतरलेली मुंबई एक्सप्रेस काही दिवसांपासून रिकामी धावत होती. लॉकडाऊनमुळे प्रवाशांनी मुंबईमार्गे प्रवास करणे कमी केले आहे. त्यामुळे या गाडीच्या आरक्षणाची मागणी मंदावली आहे. दररोज निम्मे बर्थ रिकामे घेऊन मुंबई एक्सप्रेसचा प्रवास सुरु होता. एरव्ही नियमित हाऊसफुल्ल धावणारी अमरावती - मुंबई एक्स्प्रेस कोरोना संसगार्मुळे रिकामी धावत आहे. दिनांक २७ एप्रिल ते ३ मे दरम्यान निरंतर येथील मॉडेल रेल्वे स्थानकावरील आरक्षण खिडक्यांवर रिफंड मिळण्यासाठी प्रवासी रांगेत दिसत आहेत. दरदिवशी आरक्षण तिकीट रद्द करताना प्रवाशांना सव्वा ते दीड लाख रूपये परत करावे लागत आहेत.
----------------
सात दिवसात अशी परत केली रक्कम (रिफंड)
२७ एप्रिल : १ लाख ३४ हजार
२८ एप्रिल : १ लाख २८ हजार
२९ एप्रिल : १ लाख ४७ हजार
३० एप्रिल : १ लाख २९ हजार
१ मे : १ लाख ४६ हजार
२ मे : १ लाख २५ हजार
३ मे : १ लाख ५० हजार
-----------------------
मंबई एक्स्प्रेसचे दरदिवशी सुमारे १५० प्रवासी आरक्षण तिकीट रद्द करत आहेत. त्या अनुषंगाने सव्वा ते दीड लाखांपर्यंत रक्कम परतावा म्हणून परत दिली जात आहे. १० मेपर्यंत मुंबई एक्सप्रेस रद्द केली आहे.
- डी. व्ही. धकाते, आरक्षण प्रमुख, अमरावती रेल्वे स्थानक