चिखलदरा (अमरावती) : विदर्भाच्या नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळाप्रमाणेच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या विविध भागात सुरू असलेल्या जंगल सफारी, हत्ती सफारीसाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. ब्रिटिशकालीन रेस्ट हाऊस पसंतीस उतरले आहे. मेळघाटात वाघ, बिबट, अस्वल, रानगव्याचे दर्शन पर्यटकांसाठी एक पर्वणी ठरले आहे.
चिखलदरा पर्यटनस्थळाप्रमाणेच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वैराट, सेमाडोह, शहानूर, नरनाळा, बोरी, धारगड, वसाली, सिपना गुगामल व अकोट वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या जंगल सफारीसह कोलकास येथील हत्ती सफारीला मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. आणि मागील दोन वर्षांपासून कोरोनाकाळात अनेक कुटुंबांचे आखलेले बेत आता पर्यटनाने पूर्ण होऊ लागले आहेत.
जिप्सीचालकांना रोजगार
जंगल सफारीदरम्यान पर्यटकांना खुल्या जिप्सीमधून ठरलेल्या शासकीय दराने नेले जाते. एका जिप्सीमध्ये सहा पर्यटक जंगल. सफारीला जातात. चिखलदरा, नरनाळा, धारगड, बोरी येथील जवळपास ७० जिप्सी चालक असून जंगल सफारी व पर्यटन स्थळावरील विविध पॉईंटसाठी त्यांना मोठ्या प्रमाणात आता रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे.
ब्रिटिशकालीन विश्रामगृहाला पसंती
मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत मोठ्या प्रमाणात ब्रिटिशकालीन विश्रामगृहे आहेत. जंगलातील कोलकास, रंगबेली, हतरू, चौराकुंडसह सेमाडोह येथील पर्यटन संकुल पर्यटकांना आरक्षणावर दिले जात असून इतरांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे.
मेळघाटच्या राजाचे दर्शन
जंगल सफारीदरम्यान पर्यटकांना आता हमखास वाघ, बिबट, अस्वल, रानगवा, सांबरं, हरिण, मोर तसेच विविध पक्षी-प्राण्यांचे दर्शन होऊ लागले आहे. नरनाळा, शहानूर जंगल सफारी दरम्यान मेळघाट वन्यजीव ग्रुपचे फिरोज खान रहीस खान, अब्दुल जाबीर सिद्दिकी, शेख अन्सार शेख हसन, शेख अजीज शेख रशीद, शेख जावेद शेख भिक्कन, शेख जावेद शेख बिराम या चमूने जंगल सफारी दरम्यान झालेल्या प्राण्यांचे दर्शन लोकमतशी बोलताना कथन केले. सेमाडोह जंगल सफारीतसुद्धा विविध वन्यजिवांसह वाघाचे दर्शन पर्यटकांना होत असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सम्राट मेश्राम यांनी दिली.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारी पर्यटकांनी नक्की करावी. वन्यप्राणी, निसर्ग सौंदर्याने मेळघाट बहरला आहे.
फिरोज खान राईस खान, अध्यक्ष, मेळघाट वन्यजीव ग्रुप
जंगल सफारी, हत्ती सफारी व 'विश्रामगृह आरक्षणातून मोठ्या प्रमाणात रोजगार व व्याघ्र प्रकल्पाला महसूल उपलब्ध होत आहे.
- स्वप्निल बडगे, समन्वयक मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती