लॉकडाऊनचा बोजवारा, महसूल, पोलीस प्रशासनाने पिटाळले
वरूड : तालुक्यातील वाठोडा नजीकच्या दाभी या ओसाड गावातील जनामाय देवस्थानात जिल्हाबंदीचे आदेश धुडकावून ३०० च्या आसपास भाविकांनी नवस फेडण्याकरिता हजेरी लावली होती. नागपूर जिल्ह्यातील त्या ३०० भाविकांना प्रशासनाने पिटाळून लावले. शनिवारी पोलीस, महसूल यंत्रणेला त्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
चैत्र महिन्यात तेथे नवस फेडणाऱ्यांची गर्दी असते. परंतु कोरोना काळातील संचारबंदीमुळे त्यावर विरजण पडले आहे. तरीसुद्धा लॉकडाऊनला केराची टोपली दाखवून नागपूर जिल्ह्यातून ३०० जणांचा जत्था शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास दाभी येथे पोहोचला. परंतु, पोलीस आणि महसूल प्रशासनाला माहिती मिळताच घटनास्थळ गाठून त्यांनी नवस फेडणाऱ्यांना पिटाळून लावले. यावेळी भाविकांची भागमभाग झाली. जिल्हाबंदी असताना ते वरूड तालुक्यात पोहचले कसे?, त्यांना पोलिसांनी अडविले नाही काय, हा प्रश्न आहे. नवस फेडून जेवणाची तयारी असताना ठाणेदार प्रदीप चौगावकर तसेच महसूल अधिकाऱ्यांनी पथकासह घटनास्थळ गाठून आलेल्या सर्व भाविकांची चौकशी करून त्यांना हाकलून लावले.