अनिल कडू
परतवाडा : अचलपूर तालुक्यातील पिंपळखुटा निवासी शहीद सैनिकाला अखेरचा निरोप देतेवेळी उसळलेल्या गर्दीत पाकीटमारांनीही हात साफ केले. आठ ते दहा लोकांचे पाकीट या खिसेकापूंनी मारलेत. यात पैशांसोबतच आधार कार्ड, ड्रायव्हींग लायसन्सह महत्त्वाची कागदपत्रे त्यांनी लंपास केली आहेत.
रविवार २७ डिसेंबरला पिंपळखुट्यासह देवगावात जनसागर उसळला होता. यात लगतच्या पंचक्रोशीतील गावागावांतून आणि जिल्ह्यातून लोक आले होते. नेमक्या याच गर्दीचा फायदा त्या पाकीटमारांनी घेतला. यात पिंपळखुटा येथील बाबूलाल धांडे यांच्यासह धामणगाव गढी व अन्य गावांतील लोकांचे पाकीट गहाळ केल्याची माहिती खुद्द बाबूलाल धांडे यांनी लोकमतला दिली.
बाबूलाल धांडे हे शहीद कैलासच्या कुटुंबीयांचे निकटवर्ती आहे. कैलासच्या अपघातील मृत्यूची वार्ता गावात समजल्यापासून तर अखेरचा निरोप देण्यापर्यंतची त्यांची धावपळ राहिली आहे. दरम्यान आदिवासी बांधवांमध्ये मृताला अग्नी देण्याची प्रथा नाही. त्यास मूठमाती ते देतात. पण शहीद सैनिक कैलासचे अपघातील निधन आणि झालेले शवविच्छेदन व शासकीय इतमामातील अंत्यसंस्कार बघता कैलासच्या पार्थिवाला अग्नीदेण्याचा निर्णय त्याच्या कुटुंबीयांसह आदिवासी बांधवांनी घेतला.
कोट
अपघातील निधन, शवविच्छेदन आणि शासकीय इतमामातील अंत्यविधी बघता शहीद सैनिक कैलासच्या पार्थिवाला अग्नी दिला गेला. आदिवासी बांधवांत अग्नी दाहाची पद्धत नाही. नैसर्गिक मृत्यूत मूठमाती देण्याची प्रथा आहे. २७ डिसेंबरच्या गर्दीत माझ्यासह सात ते आठ लोकांचे पाकीट, पाकीटमारांनी मारले.
- बाबूलाल धांडे, पिंपळखुटा