चिखलदरा : शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठ्या प्रमाणावर पर्यटकांनी हजेरी लावली. त्यामुळे पर्यटन स्थळ गजबजून गेले होते. पर्यटकांनी येथील आल्हाददायक वातावरणाचा मनसोक्त आनंद घेतला.विदर्भातील एकमेव थंड हवेचे पर्यटनस्थळ असलेल्या चिखलदरा शहरात शनिवार-रविवार या दोन दिवसांत दहा हजारांवर पर्यटकांनी येथील विविध पॉइंटला भेटी दिल्यात. दाट धुके, क्षणात धो-धो कोसळणाऱ्या पावसाचा मनसोक्त आनंद घेत पर्यटक ओलेचिंब झाले. येथील सर्वच पॉइंटवर एकच गर्दी असल्याने नंदनवन पर्यटकांनी फुलून गेले होते. यंदा तब्बल महिनाभरानंतर पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे चिखलदरा पर्यटन स्थळाचे नयनरम्य दृश्य, गगनभेदी उंच पहाडातून कोसळणारे धबधबे, खळखळ वाहणारे नदी-नाले पर्यटकांना आकर्षित करणारे ठरले आहे. चिखलदरा नगरपालिकेच्या पर्यटक कर नाक्यावर दोन दिवसांत दहा हजारांवर पर्यटकांची नोंद झाली. त्यातून पालिके ला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त झाला आहे.
विदर्भाच्या नंदनवनात पर्यटकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 1:33 AM