कोरोना नियमांचा फज्जा, वैद्यकीय क्षेत्रातही ‘जैसे थे’ स्थिती, भावी डॉक्टरांना काय संदेश देणार?
अमरावती : विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीद्वारे संचालित येथील प्रा. राम मेघे दंत महाविद्यालयात मंगळवारी प्रात्यक्षिक परीक्षेला विद्यार्थ्यांची तुडुंब गर्दी होती. कोरोना नियमांचे पालन करून शैक्षणिक उपक्रम, परीक्षा घेण्यात याव्यात, असे राज्य शासनाचे निर्देश आहेत. मात्र, कोरोना नियमांचा फज्जा उडवत एकाच हॉलमध्ये ऑफलाईन प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आल्या असून, भावी डॉक्टरांना कोरोना संक्रमणाच्या खाईत लोटण्याचा प्रकार घडला आहे.
महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सचे दंत महाविद्यालयावर नियंत्रण आहे. ऑनलाईन शिक्षण आणि ऑफलाईन प्रात्यक्षिक परीक्षेचा निर्णय घेत असताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि सुरक्षितता जोपासावी, असे निर्देश विद्यापीठाचे आहेत. कोरोनामुळे केईएमसारख्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन प्रणाली असताना, मंगळवारी सकाळी ९ ते ११ वाजता बायोकेस, तर दुपारी १ ते ३ या वेळेत ॲनाटॉमी या विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांना विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले. झालेली गर्दी बघता कोरोनाचा नक्कीच स्फोट होईल, असे चित्र अनुभवता आले. प्रात्यक्षिक परीक्षेला यवतमाळ, वाशिम, बुलडाणा, अकोला, यवतमाळ येथून विद्यार्थी उपस्थित हाेते. ऑनलाईन शिक्षण सुरु असताना प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाईन का नाही, असा सवाल काही पालकांनी उपस्थित केला आहे. विद्यार्थ्यांचा जीव महत्त्वाचा असून, प्रात्यक्षिक परीक्षा पुन्हा देता येईल, असाही सूर उमटू लागला आहे. येथील दंत महाविद्यालयात बीडीएसला १००, एमडीएसला १०, तर पीएचडी प्रवेशाला १० विद्यार्थी आहेत. वैद्यकीय क्षेत्रात कोरोना नियमांचे पालन होत नसेल, तर सामान्य व्यक्तिंना भावी डॉक्टर काय संदेश देतील, असा सवाल उपस्थित होत आहे.
-------------------
दंत महाविद्यालय बंद करू नये, अशी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची गाईड लाईन आहे. वर्गशिक्षणासाठी उपस्थिती अनिवार्य नाही. विद्यार्थ्यांना यात मुभा दिली आहे. ऑनलाईन शिक्षण निरंतर सुरू आहे. विद्यार्थ्यांना बेसिक ज्ञान देण्यात येत असून, पुढे या विद्यार्थ्यांची कोरोना योद्धा म्हणून सेवा घेण्यात येईल. कोरोना नियमांचे पालन करून परीक्षा होतील.
- राजेश गोंधळेकर, अधिष्ठाता, दंत महाविद्यालय.