नांदगाव खंडेश्वर : येथील दिनेश अंभोरे या युवा शेतकऱ्याने भाजीपाल्याला भाव नाही म्हणून जनावराचा चारा विक्रीसाठी वैरण पिकाची लागवड केली. या शेतकऱ्याचे पहूर शिवारात बेंबळा नदीलगत चार एकर बागायती शेती आहे. यात त्यांनी पालक, मेथी, सांबार, चवळी, घोळ या भाजीपाल्याची अर्धा एकरात लागवड केली होती.
कोरोनाच्या संकटामुळे आठवडी बाजार बंद आहे. त्यामुळे या पिकाला त्यांना फक्त दहा रुपये किलो भाव मिळाला. मशागतीचा व भाजीपाला तोडणीचा खर्चही निघत नव्हता म्हणून या शेतकऱ्याने भाजीपाल्याला पर्यायी पीक म्हणून जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याच्या विक्रीसाठी वैरण पिकाची दोन एकरांत १७ मार्चला लागवड केली. आज हे वैरण पीक साडेतीन ते चार फुटांचे झाले आहे. मे महिन्याच्या २० तारखेला हे पीक काढणीला येईल व जनावरांसाठी चारा म्हणून ते विक्री करणार असल्याचे या शेतकऱ्याने सांगितले.