फोटो पी २५ बैठक
चांदूर बाजार : ग्रामीण भागात शेतमाल व पशुधनाच्या चोऱ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे शेतकरी बेजार झाला आहे. तसेच ग्रामीण भागात अवैध दारू व गुटखाविक्रीमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. या घटनांना आवर घालणे तर सोडाच; चोरी झालेल्या घटनांचा शोधही पोलिसांना लागत नाही. यावरून पोलीस प्रशासन ग्रामीण भागातील अशा घटना गांभीर्याने घेत नाही, असे जाणवते. त्यासाठी पोलिसांनी ग्रामीण भागातील चोऱ्यांवर व अवैध धंद्यांवर त्वरित अंकुश ठेवावा, असे आदेश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाला दिले आहेत.
या संदर्भात राज्यमंत्र्यांनी नुकतीच एक बैठक परतवाडा येथील विश्रामगृहात घेतली. या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच चांदूर बाजार व अचलपूर तालुक्यांतील सर्वच ठाण्यांचे ठाणेदार उपस्थित होते. या बैठकीत पोलिसांच्या सोयीसाठी चांदूर बाजार व अचलपूर तालुक्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या गोठ्यांतील पशुधन चोरीस जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शेतकऱ्यांनी मळणी करून ठेवलेला, शेतमालही शेतातून चोरीला जात आहे. या चोरीच्या घटनांमुळे, शेतकऱ्यांचे खूपच नुकसान होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी पुन्हा सावकारांच्या दारात जावे लागते. हे सर्व टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने दक्ष राहण्याची गरज आहे, असे मत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या बैठकीत व्यक्त केले.
या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी पोपटराव अब्दागिरे, परतवाड्याचे ठाणेदार सदानंद मानकर, चांदूर बाजारचे ठाणेदार सुनील किनगे, तसेच तालुक्यातील ग्रामीण ठाण्यांचे ठाणेदार पंकज दाभाडे, दीपक वळवी, जमील शेख, किशोर तावडे, सुरेंद्र बेलखेडे, इत्यादी उपस्थित होते.