फोटो पी ३० चोरटे फोल्डर
अमरावती : ग्रामीण भागात शेतानजीकचा वीजपुरवठा खंडित करून घरफोडी करणाऱ्या चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केली.
विनोद तुकाराम चव्हाण (२६), दिनेश तुकाराम चव्हाण (२३, दोघेही रा. डेबुजीनगर, रहाटगाव, अमरावती), इग्नेश मलप्पा चव्हाण (२५) व विकास ऊर्फ रंग्या मलप्पा चव्हाण (४०, दोघेही रा. वाघोली) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी अमरावतीसह वर्धा, नागपूर व परभणी जिल्ह्यातील चोरीच्या घटनांची कबुली दिली. आरोपींकडून ५ लाख ८० हजारांच्या सोन्यासह एकूण ६ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अडगाव खुर्द येथील जयश्री नागसेन शेंडे यांच्या घरातून सोन्याचे दागिने व नगदी असा एकूण १,७७,४०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. २१ मार्च २०२१ रोजी लोणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रात्रीच्या घरफोडीच्या घटना पाहता पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी, विजय गराड, तसलीम शेख यांचे पथक महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन आरोपींचा शोध व माहिती घेत होते. त्या अनुषंगाने ३० जुलै रोजी स्थनिक गुन्हे शाखेचे पथक लोणी (टाकळी), चांदूर रेल्वे परिसरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना आरोपींविषयी खात्रीलायक माहिती मिळाली.
चोरीपूर्वी रेकी
विनोद चव्हाण हा त्याच्या साथीदारासह वाघोली, अमरावती अशा वेगवेगळ्या ठिकाणी पाल ठोकून राहतो. ते दिवसा खेडेभागात झाडू विकण्याच्या बहाण्याने तेथील घरे पाहून रात्रीच्या वेळी आपल्या साथीदारासह पुन्हा त्याच गावात येऊन तेथील घरफोडी करतो, अशी माहिती मिळाली. पाल ठोकून राहत असलेल्या ठिकाणी पोलीस पथकातील स्टाफने वेशांतर करून सापळा यशस्वी केला. त्यामुळे अन्य तीन आरोपीदेखील हाती आले. लोणी, तळेगाव, तिवसा, कुर्हा, चांदूर रेल्वे, मंगरूळ दस्तगीर, दत्तापूर, चांदूर बाजार, मंगरूळ चव्हाळा येथे घरफोड्या केल्याची कबुली दिली.