अमरावती : अमरावतीत शनिवार, दि. १३ नोव्हेंबरपासून लागू करण्यात आलेली संचारबंदी उठविण्याबाबत सोमवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी निर्णय घेतला जाणार आहे.
शहराची परिस्थिती पाहून तो निर्णय स्थानिक स्तरावर घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे अपर पोलीस महासंचालक राजेंदर सिंग यांनी दिली आहे. मात्र, तोपर्यंत संचारबंदीत रोज २ ते ३ तास अशी शिथिलता देण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे सध्यातरी २१ नाेव्हेंबरपर्यंत संचारबंदी असल्याचे स्पष्ट झाले.
१२ नोव्हेंबर रोजी निघालेल्या मोर्चादरम्यान करण्यात आलेली नासधूस, तोडफोडीचा निषेध म्हणून १३ रोजी भाजपकडून बंद पुकारण्यात आला. त्यादरम्यान शहरातील विविध ठिकाणी तोडफोड व लूटपाट करण्यात आली. परिणामी प्रभारी पोलीस आयुक्तांकडून संचारबंदी लागू करण्यात आली. त्याअनुषंगाने अपर पोलीस महासंचालक राजेंदर सिंग यांनी शनिवारपासून शहरात मुक्काम ठोकला आहे.
दोन्ही दिवसांतील घटनांच्या अनुषंगाने मंगळवारी त्यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. तर, इंटरनेट बंदीचा बुधवारी सायंकाळी आढावा घेतला जाणार आहे. गुरुवारपासून इंटरनेट बंदीचा आदेश मागे घेण्यात येण्याची शक्यता आहे.
किरीट सोमय्या यांच्या दौऱ्यास मनाई
भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या १७ तारखेच्या अमरावती दौऱ्यास पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी परवानगी नाकारली आहे. शांतता व सुव्यस्थेसाठी शहरात संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आलेले आहे. त्यामुळे बुधवारचा दौरा स्थगित करण्याचे पत्र पोलीस आयुक्तांनी सोमवारी किरीट सोमय्या यांनी दिले आहे.
अमरावतीमध्ये ज्या पद्धतीने दहशत माजविण्याचा प्रयत्न झाला, याला ठाकरे सरकारची मूक संमती होती, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला, मला अमरावतीकरांची व्यथा व स्थिती समजवून घ्यायची आहे. मात्र, पोलीस आयुक्तांनी दौऱ्यावर प्रतिबंध असल्याचे असल्याचे पत्र दिल्याचे सोमय्या यांनी सांगितले.