अमरावती : त्रिपुरातील हिंसाचाराच्या निषेधार्थ शुक्रवारी मुस्लीम समुदायाने पुकारलेल्या आंदोलनात दगडफेक झाली. त्या निषेधार्थ भाजपने शनिवारी केलेल्या अमरावती बंदच्यावेळी हिंसाचार झाला. परिणामी, शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असून इंटरनेट सेवा खंडित केली आहे.दुपारी दोन समुदाय समोरासमोर आले. एक जमाव पोलिसांच्या अंगावर आला, तर एकाने धार्मिक स्थळाची नासधूस केली. पोलिसांनी जमावावर रबर बुलेटचा मारा करीत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. पोलिसांवर हल्ला करणारांवर लाठीचार्ज करण्यात आला. हिंसाचारादरम्यान एका पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस जखमी झाले. त्यामुळे नागपूर, अकोला, यवतमाळ, वाशिम येथून अतिरिक्त पोलीस कुमक बोलाविली. अमरावती एसआरपीएफच्या पाच तर नागपूरहून दोन तुकड्या आणल्या. तणाव असला तरी तो आटोक्यात होता. प्रभारी शहर पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी शहर आयुक्तालय क्षेत्रात १३ नोव्हेंबर ते पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू केली. दरम्यान, राज्याचे अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) राजेंद्र सिंह सायंकाळी अमरावतीत दाखल झाले.युवकाच्या पंजाच्या झाल्या ठिकऱ्यापोलिसांनी जमावाच्या दिशेने सोडलेले अश्रुधुराचे नळकांडे एकाने झेलले. ते त्याच्या हातातच फुटले व त्याच्या संपूर्ण पंजाच्या अक्षरश: ठिकऱ्या उडाल्या. टांगा पाडाव चौकापुढे धुमश्चक्रीदरम्यान ६ पेक्षा अधिक आंदोलक जखमी झाले.
अमरावतीत बंदही हिंसक, संचारबंदी लागू; इंटरनेट सेवा खंडित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 6:30 AM