कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात यापूर्वीच लागू करण्यात आलेले संचारबंदीचे आदेश ३१ जानेवारीपर्यंत कायम ठेवण्यात आले आहे. तसा आदेश जिल्हा दंडाधिकारी शैलेश नवाल यांनी गुरुवारी जारी केला.
‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत लॉकडाऊन उघडण्याबाबत जारी केलेले विविध आदेशही कायम आहेत. त्यामुळे कंटेन्मेंट झोनच्या बाहेरील क्षेत्रातील सर्व सेवा व उपक्रम यापूर्वी जसे सुरू होते तसे सुरू राहतील. अत्यावश्यक सेवेंतर्गत असलेली सर्व दुकाने, आस्थापना तसेच यापूर्वी परवानगी देण्यात आलेली दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत सुरू राहतील.
लग्नसमारंभासाठी केवळ ५० उपस्थितांची अट कायम ठेवण्यात आली आहे. धार्मिक यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसंमेलने, सामूहिक कार्यक्रम, सभा, बैठका, मिरवणुका, रॅली, भाषणबाजी यांना प्रतिबंध राहील. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती, संस्थेवर कारवाई करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही अशा अधिकाऱ्यास प्राधिकृत करण्यात आले आहे.