चंद्रभागेकडून सतर्कतेचा इशारा : मासोळ्या, खेकड्यांची पिल्लावळ बाहेर
अनिल कडू
परतवाडा : धो-धो कोसळलेल्या पावसामुळे अचलपूर तालुक्यातील शहानूर, चंद्रभागा व सपन प्रकल्प पाण्याने लबालब भरली आहेत. दरम्यान शहानूर धरणावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यात पर्यटकांना धरणावर येण्यास मनाई करण्यात आली आहे.
शहानूर धरणावर संचारबंदी लागू केल्याचा शाखा अभियंता सु. अ. हिरेकर यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. चंद्रभागा व सपन प्रकल्पाच्या प्रतिबंधित क्षेत्रात लोकांसह पर्यटकांना प्रवेश घेण्यास धरण प्रशासनाने मनाई केली आहे. चंद्रभागा प्रकल्प अधिकाऱ्यांनी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसे पत्र त्यांनी स्थानिक प्रशासनाला दिले आहे.
आवश्यक त्या साठ्यापेक्षा पाण्याचा अधिक साठा होत असल्यामुळे शहानूर धरणाचे चारही दरवाजे २५ सेंटीमीटरने, शुक्रवार २३ जुलैला, सकाळी ८ वाजता उघडण्यात आले. शहानूर धरण ६१ टक्के भरले आहे. सपन प्रकल्पाचे उघडलेल्या चारही दरवाज्यांची उंची २० सेंटीमीटरने वाढविली आहे. सपन प्रकल्प क्टक्के भरला आहे.
चंद्रभागा प्रकल्प ६८ टक्के भरला आहे. या महिन्याच्या अखेरीस ७६ टक्के जलसाठा आवश्यक आहे. दरम्यान पाण्याचा येवा सुरूच असल्यामुळे शुक्रवार २३ जुलैला नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिला आहे. पाण्याची आवक वाढल्यास चंद्रभागा धरणाचे दरवाजे केव्हाही उघडले जाऊ शकतात, असे शाखा अभियंता ओमकार पाटील यांनी सांगितले.
सपन प्रकल्पावर शाखा अभियंता गौरव आवनकर, शहानुर धरणावर शाखा अभियंता सुमित हिरेकर, तर चंद्रभागा धरणावर शाखा अभियंता ओमकार पाटील लक्ष ठेवून आहेत.
मासे आणि खेकडे
शहानूर आणि सपन प्रकल्पात मोठमोठे मासे आणि खेकड्यांची पिलावळ विकसित झालेली आहे. या दोन्ही धरणांची सर्व दारे उघडल्यामुळे शहानूर आणि सपन नदी दुथडी वाहू लागली आहे. वाहत्या पाण्याबरोबर धरणातील मासे आणि खेकड्यांची पिलावळ धरणाबाहेर पडत आहे. नदीपात्रात आढळून येणारे मासे आणि खेकड्यांची पिलावळ गावकऱ्यांसाठी पर्वणी ठरत आहे. अधिक वजनाचे मासे पकडण्यात अनेक जण गुंतले आहेत. चंद्रभागा नदी किनारी वास्तव्यास असलेली मंडळी माशांसाठी चंद्रभागेचे गेट उघडण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
कोट:
सपन प्रकल्पाचे चारही दरवाजे २० सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. धरण ६८ टक्के भरले आहे.
- सुबोध इंदुरकर, उपविभागीय अभियंता, सपन प्रकल्प.
कोट
शहानूर प्रकल्पाची दहा सेंटिमीटरने उघडलेली चारही दारे २५ सेंटीमीटरने उघडली आहेत. धरण ६१ टक्के भरले आहे. धरणावर संचारबंदी लागू आहे.
- सु.अ. हिरेकर, शाखा अभियंता, शहानूर प्रकल्प
फोटो कॅप्शन : चंद्रभागा प्रकल्पाचे दृश्य