लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आता अमुक अभ्यासक्रम घेऊन शिक्षण घेणे बंधनकारक नाही. कला, वाणिज्य, विज्ञान अथवा अभियांत्रिकी अशा कोणत्याही शाखांमधील अभ्यासक्रमाचे विषय विद्यार्थ्यांना निवडता येतील. नवीन शैक्षणिक धोरणानुसार ही बाब शक्य असून, येत्या शैक्षणिक वर्षात म्हणजेच जुलै २०२२ पासून ही संधी विद्यार्थ्यांना मिळेल, अशी माहिती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे यांनी मंगळवारी येथे दिली. जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित ‘प्रेस द मीट’मध्ये ते बोलत होते. कुुलगुरु डॉ. मालखेडे यांनी अभ्यासक्रमात बदल करताना महाविद्यालये आणि विद्यापीठाने त्यांची कर्तव्यपूर्ती करावी आणि विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. ज्या विद्यापीठातून पदवी घेतली, त्याच विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून जबाबदारी हाताळताना आनंदी आहे. पण, भूमिपुत्र म्हणून या विद्यापीठाचे ऋणदेखील फेडायचे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मात्र, विद्यार्थी आणि शिक्षकांमधील संवाद आनंददायी असावा, यासाठी महाविद्यालयांना कर्तव्य पार पाडावे लागेल. दरवर्षी लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी प्रवेश घेतात. मात्र, पदवी घेणाऱ्यांची संख्या ५० टक्केच आहे, ही बाब गंभीर असल्याबाबत त्यांनी लक्ष वेधले. आंतरराष्ट्रीय स्तरानुसार गुणांकन प्रणाली लागू होत असून, क्रेडिट सिस्टीम, ग्रेड मार्क प्रणालीची अंमलबजावणी होणार आहे. तसेच कोणत्याही कारणास्तव अर्धवट शिक्षण सोडून गेलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल. मायनर डिग्री, संशोधन कार्य वाढविण्यासाठी अनुदानात वाढ केली जाणार असल्याचे कुलगुरुंनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल उपस्थित होते.
चांगला माणूस घडविण्याचा प्रयत्नसंत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार अभ्यासक्रमात आणले जातील. त्यानुसार तयारी केली आहे. व्हॅल्यू एज्युकेशनद्धारे चांगला माणूस घडविण्यासाठी विद्यापीठाचे प्रयत्न असेल. अमानवी कृत्ये होणार नाही. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम निर्माण करण्यासाठी अभ्यासक्रम राहणार असल्याची ग्वाही कुलगुरु डॉ. मालखेडे यांनी दिली.
पदव्युत्तर प्रवेशासाठी केंद्रीय प्रणालीअमरावती विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पदव्युत्तर प्रवेशासाठी यापुढे केंद्रीय प्रवेश प्रणाली असणार आहे. त्याकरिता ऑनलाइन अर्ज करावा लागेल. प्रवेशासाठी तीन फेरी होतील. यातून पारदर्शकता आणि महाविद्यालयाची माहिती स्पष्ट होईल, असे कुलगुरु डॉ. मालखेडे म्हणाले.