परतवाडा : पोळा सणाच्या करीनिमित्त मटण व्यवसायिकांनी आणून ठेवलेले तीन बोकड शनिवारी रात्री लंपास झाल्यानंतर २४ तासांच्या आत परतवाडा पोलिसांनी शोधून काढले व दोघांना अटक केली. मात्र, आता या तीनही बोकडांचा न्यायालयाच्या परवानगीनंतरच ताबा मिळणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा करीच्या बोकड्याना जीवदान मिळाल्याची चर्चा शहरात होत आहे
अजय धनराज हटेल (२६), अर्जुन भगवानसिंग मोरले (१९, दोघे रा. आठवडी बाजार, परतवाडा) अशी चोरट्यांची नावे आहेत. आठवडी बाजाराच्या मटण मार्केटच्या गोदामातून कुलूप तोडून तीन बोकड त्यांनी चोरले. पोलिसांनी ४२ हजार रुपये किमतीच्या तीन बोकडांसह चोरीत सहभागी दुचाकी असा एकूण ६२ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. मटण विक्रेते अतुल कुहेकर (२७, रा. गटरमलपुरा, परतवाडा) यांनी त्यांच्या मालकीचे तीन बोकड ४ सप्टेंबर रोजी रात्री ११:३० वाजता चोरीला गेल्याची फिर्याद रविवारी सकाळी परतवाडा पोलिसात दिली. त्यावरून परतवाडा ठाणेदार सदानंद मानकर, उपनिरीक्षक मनोज कदम, जमादार विनोद राऊत, प्रमोद चौधरी, दीपक राउत, नायक पोलीस जयसिंग चव्हाण, कमलेश मुराई, सचिन होले, काँस्टेबल शुभम मारकंड, विवेक ठाकरे, वैभव ठाकरे, नाजिम शेख, मंगेश फुकट यांनी कुठलाही पुरावा नसताना आरोपीचा शोध घेतला.