बचतीसाठी पुढाकार : आयुक्तांचे धाडसी पाऊलअमरावती : महापालिकेवर ओढवलेले आर्थिक अरिष्ट पाहता आयुक्त हेमंत पवार यांनी बचतीसाठी पुढाकार घेतला आहे. अनावश्यक कंत्राटी कर्मचाऱ्यांची छाननीनंतर कपात केली जाणार आहे. आयुक्तांनी शनिवारी कंत्राटी कर्मचारी-कामगारांचा विभागनिहाय आढावा घेतला. त्यात संबंधित घटक प्रमुखांकडून आलेल्या अहवालानुसार तूर्तास महापालिकेत ४५४ कंत्राटी कामगार-कर्मचारी कार्यरत आहेत. त्याअनुषंगाने प्रत्यक्षात खरोखर एवढ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची गरज आहे का? की कुणाच्या सांगण्यावरून ही संख्या फुगविण्यात आली, या अनुषंगाने आयुक्तांनी कंत्राटी सेवेचा आढावा घेतला. दरम्यान कंत्राटीची संख्या, त्यांचे मानधन स्पष्ट झाल्याने ही यादी उभय उपायुक्तांना देण्यात आली आहे. कंत्राटीतील किती व्यक्ती कमी करायचेत, याबाबतची छाननी करण्याच्या सूचना उपायुक्तद्वयांना देण्यात आल्या आहेत. उपायुक्तद्वय छाननीनंतरची संख्या आयुक्तांना कळवतील व त्यानंतर मंगळवार ७ फेब्रुवारीच्या बैठकीत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कपातीवर शिक्कामोर्तब होईल. अनावश्यक ठिकाणचे कामगार-कर्मचारी कामावरून कमी करण्यात येणार आहे. यात सुरक्षा रक्षक, संगणक परिचालक, शिपाई, मजूर आणि अन्य कंत्राटी कर्मचाऱ्यांंचा समावेश असेल. (प्रतिनिधी)संगणक परिचालकांची परीक्षाअवघा ३५ चा करारनामा असताना जानेवारी १७ अखेर संगणक चालकांचा आकडा ७४ वर जावून पोहोचला. या संख्येत कपात करण्यासाठी ७४ संगणक चालकांची पालिकास्तरावर परीक्षा होईल. मंगळवारच्या छाननीनंतर परिक्षेची तारीख निश्चित होणार आहे.
कंत्राटींच्या संख्येत कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2017 12:10 AM