लोकमत न्यूज नेटवर्क
अनिल कडूअमरावती : जिल्ह्याच्या विविध भागात हिरव्या झाडांची सर्रास कत्तल सुरू आहे. या अवैध वृक्षतोडीदरम्यान आंबा, कडूनिंब, बाभळीची झाडे कापली जात असल्याचा प्रकार वनविभागाने केलेल्या शुक्रवारच्या कारवाईतून उघड झाला आहे.अंजनगाव बर्फ कारखान्यालगतच्या अजिजपुरा स्थित कापसाच्या रेच्याजवळ मोकळ्या जागेत लाकडाचा मोठा साठा असल्याची माहिती वनविभागास मिळाली. उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांना मिळालेल्या या माहितीच्या आधारे फिरत्या पथकाचे आरएफओ महेश धंदर यांनी परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर बारखडे यांना घेवून तेथे शुक्रवार १ मार्चला धाड टाकली. या धाडीत आंबा व कडूनिंबाचे दोन ट्रक लाकूड त्यांनी जप्त केले. शहानूर नदीपात्रालगत हे अवैध लाकूड साठविण्यात आले होते.या लाकडावर वनविभागाचा हॅमरही नव्हता. जवळपास सव्वा ते दीड लाखाचे हे लाकूड क्रेनच्या मदतीने दोन ट्रकमध्ये भरून वनअधिकाऱ्यांनी परतवाडा वनपरिक्षेत्र कार्यालयात आणले आहे. अज्ञात आरोपीविरूद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. विना परवानगी तोडले गेलेले बिना हॅमरचे हे लाकूड मोठ्या ट्रकमध्ये भरून नागपूरसह कर्नाटक, आंध्रप्रदेश, हैद्राबादमध्ये खुलेआम पाठविले जाते. ट्रक भरताना राजरोसपणे क्रेनचा वापरही केला जातो.हिरव्या झाडांची विना परवानगी कत्तल केली जात आहे. यात आंबा, कडूनिंब, बाभूळ तोडले जात आहे. अवैध वृक्षतोड थांबावी, याकरिता प्रयत्न आहेत. माहितीनुसार, कारवाई केली जात आहे.- गजेंद्र नरवणेउपवनसंरक्षक, अमरावती वनविभाग, अमरावती.घटनास्थळावरून जप्त केलेले आडजात लाकूड क्रेनच्या सहाय्याने ट्रकमध्ये भरून परतवाडा येथे आणण्यात आले आहे. अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. जप्त मालाची किंमत जवळपास सव्वा लाख आहे.- शंकर बारखडेवनपरिक्षेत्र अधिकारी, परतवाडा.