दोन महिन्याचे धान्य पडून : खरे लाभार्थीही धान्यापासून वंचित मोहाडी : मोरगांव येथील स्वस्त धान्य दुकानदाराने खुल्या बाजारात धान्य विकण्यासाठी शिधापत्रिकाधारकांचा बनावट डी-वन तयार केला. बनावट डी-वनचा घोटाळा उघडकीस आला. चौकशीनंतरही डी-वन बाबत निर्णय न झाल्याने दोन महिन्याचे धान्य लाभार्थ्यांना मिळाले नाहीत. तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभाग असो की मग, संजय गांधी निराधार योजनेचा विभाग याच्या आत खोलवर शिरले तर बऱ्याच भानगडी समोर यायला लागतील. काही वर्षापूर्वी अन्न पुरवठा विभागात धान्य घोटाळा झाला होता. ‘लोकमत’ने या घोटाळयाचे बिंग फोडले होते. त्यामुळे दोन कर्मचारी निलंबित झाले होते. आताही तिच स्थिती आहे. अन्न पुरवठा विभागात एक डी वन असतो. दुसरा दुकान मालकाकडे मग हे सगळं असताना मागील सहा वर्षापासून कोणाच्या मदतीने सगळं सुरळीत सुरु होता याची चौकशी आयुक्तामार्फत केली जावी अशी मागणी मोरगाव वासीयांची आहे. मुळात शिधापत्रिकाधारक कमी अन् धान्याची अधिक उचल कशी झाली. शिल्लक असलेला धान्य साठा कुठे जात होता याचा शोध होणे गरजेचे आहे. मोरगावची लोकसंख्या ५९० तर दुकान मालकाने १०६९ लोकसंख्या कशी दाखविली. एकाच कुटूंबात एक-दोन नवाची शिधापत्रिका तयार कशी झाली. अंत्योदय शिधापत्रिकाधारकांची संख्या कोणी वाढवून दिला. पती-पत्नी एकाच ठिकाणी राहतात यांचे वेगळे कार्ड बनले गेले. आईच्या गर्भातच बाळ असताना तिचे नाव काल्पनिक ठेवून शिधापत्रिका समाविष्ठ करणारा कोण आहे. लग्न नाही अन् नाव डी-वनमध्ये याही भानगडी झाल्यात. एवढेच नाही तर विविध योजनेत एकाचा नावाचा समावेश कसा झाला याची सुक्ष्मपणे चौकशी होणे आवश्यक आहे. यात स्वस्त धान्य दुकानदारसह तहसील कार्यालयातील अन्न विभागातील कारकून यांचा सहभाग असल्याचा आरोप केला जात आहे. एका मोरगावच्या स्वस्त धान्य दुकानात शिधापत्रिका/डी-वनचा घोळ दुसऱ्याही ठिकाणच्या स्वस्त धान्य दुकानात असल्याची शंका बळावली आहे. अन्न पुरवठा विभागातील लिपीक विचारलेली माहिती स्पष्टपणे देण्यास घाबरत आहेत. यावरुनच अन्नपुरवठा विभागात मोठा घोटाळा असल्याचे दिसून येते. मोरगाव येथे एका महिन्यापासून चौकशीच्या नावाखाली विलंब केले जात आहे. त्यावरुनच अन्न विभागातील कर्मचारी सारवासारव करण्याच्या भानगडीत पडून असल्याचे दिसून येते. या विभागातील कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यांवरचा ताण सर्व काही सांगून जातो. एक महिना चौकशीला लागतो. पण, शिधापत्रिकाधारकांचे काय हाल होत आहेत याचा प्रशासनाला देणे-घेणे नसल्याचे दिसते. मोरगावच्या स्वस्त धान्य दुकान मोहाडीच्या एका दुकानाला जोडण्यात आला. पण, डी-वन मधले खरे लाभार्थी कोण याचा पत्ताच नसल्याने धान्याचे वाटप कोण त्या लाभार्थ्यांला करावे असा प्रश्न मोहाडीचे दुकानदारांपुढे निर्माण झाला आहे. मोरगाव येथील २७ मार्च रोजी धान्य साठयाचा पंचनामा करण्यात आला. त्यातील १४ पोती तांदूळ, ३ पोती गहू, २५ किलो साखर तसेच ३५० लीटर केरोसीन शिधापत्रिकाधारकांना वाटपाच्या प्रतिक्षेत आहे. पोलीस पाटलाच्या ताब्यात असलेला धान्य साठा उचल करावा असे पत्र तहसीलकडून देण्यात आले. धान्याचा साठा आपल्याकडे घेणार आहे असे मोहाडी येथील स्वस्त धान्य दुकानदार राजू बावणे यांनी सांगितले. मार्च महिन्याचे धान्य शिल्लक आहे. तसेच एप्रिल महिन्याच्या धान्याची उचल करण्यात आली. तथापि, डी-वन नुसार धान्याचे वाटप करा असा ईशारा गावकऱ्यांनी मोहाडीच्या स्वस्त धान्य दुकानदाराला दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)
डी-वनच्या घोटाळयाने शिधा वाटप प्रभावित
By admin | Published: April 22, 2017 12:46 AM