तपास व्हावा : धर्मसत्तेतून अर्थसत्ता, अर्थसत्तेतून धर्मसत्ताअमरावती : प्रथमेश आणि अजय यांचा नरबळी देण्याचा जो प्रयत्न शंकर महाराज यांच्या आश्रमात झाला, त्या नरबळीच्या अनुषंगाने अघोरी विद्येला चालना देणारे सर्वच बारकावे तपासले जाणे या दोघांनाही न्याय मिळण्याच्या हेतुने महत्त्वाचे ठरणार आहे. पुण्याच्या ज्या दादा चव्हाणांचा शंकर महाराज यांच्या पिंपळखुट्याच्या आश्रमात प्रभाव आणि वास्तव्य होते त्याच दादा चव्हाणांना आश्रमातून काढून देण्यात आले. त्यांना आश्रमात येण्यासाठी ज्या काळात मनाई करण्यात आली होती, त्या काळात त्यांनी पुणे येथे दोन कोटी रुपयांच्या लागतीचे भव्य मंदिर उभारले आहे. आश्रमात त्यांना प्रवेशमनाई असलेल्या कालावधीतच हे मंदिर उभारण्यामागे नेमके काही कारण होते काय? मंदिर उभारण्याची ही उर्मी नेमकी कुठल्या उद्देशातून त्यांना आली? संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या संतांनी सामान्यजनांसाठी सुविधा उपलब्ध करवून दिल्यात. गरजुंना सोई निर्माण करवून देणे यातच त्यांनी धर्म जाणला. हीच शिकवणही त्यांनी तमाम जगताला घालून दिली. दादा चव्हाण यांनी केवळ धार्मिक भावनेतूनच हे मंदिर उभारले असेल तर त्यांना धार्मिकतेचे या संतांनी सूचविल्याप्रमाणे सेवाभावी रूपही जपता आले असते. परंतु त्यांनी तसे न करता मंदिराचे टोलेजंग बांधकाम केले. आश्रमातील वास्तव्यादरम्यान चव्हाण यांच्या प्रभावकाळात साकारण्यात आलेल्या भव्य बांधकाम निर्मितीच्या मानसिकतेशी साधर्म्य सांगणारे बांधकाम पुण्यातील त्यांच्या जमिनीवर उभारण्यात आले आहे. विशिष्ट पद्धतींच्या पुजादी कार्याबाबत दादा चव्हाण यांना असलेले आकर्षण या मानसिकतेतून प्रतिबिंबीत होते. पिंपळखुट्याच्या आश्रमाशी दादा चव्हाण यांचा संबंध न टाळता येण्याजोगा आहे. अर्थसत्तेतून धर्मसत्ता आणि धर्मसत्तेतून अर्थसत्ता, अशी समीकरणे त्यांच्याभोवती फिरतात. चव्हाणांशी संबंधित या सर्व बाबींचा सखोल तपास पोलिसांनी केल्यास बरीच गुपिते उलगडायची राहतील.
दादा चव्हाणांनी शेतात बांधले दोन कोटींचे मंदिर
By admin | Published: September 30, 2016 12:24 AM