आश्रमात डेरा कशासाठी ? : प्रभावकाळातील अपमृत्यूशी संबंध तपासावाअमरावती : प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या विद्यार्थ्यांच्या नरबळी प्रकरणाचे धक्कादायक वास्तव 'लोकमत'च्या शोधमोहिमेमुळे उघड झाल्यानंतर अनेक आश्चर्यजनक मुद्दे उघड होऊ लागले आहेत. पुण्याचे दादा चव्हाण हेदेखील तंत्रपुजेचे साधक असल्याची माहिती त्यांच्या निकटस्थ व्यक्तीने उघड केली आहे. दादा चव्हाण यांना पिंपळखुट्याच्या आश्रमात इतका रस का, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. दादा चव्हाण यांनी अनेक वर्षे आश्रमात घालविली. त्यानंतरही त्यांना हद्दपार केले गेले. दादा चव्हाण नकोच, अशी पराकोटीची भूमिका घेण्यात आली. एका भक्ताबाबत गुरुबंधू भक्तांच्या इतक्या तीव्र भावना का, असा प्रश्नही या अनुषंगाने उपस्थित होतो. दादा चव्हाण यांना तंत्रपुजेत स्वारस्य होते, अशी माहिती पुढे आली आहे. नियमित पुजापाठाच्या तुलनेत तंत्रपुजा वेगळी असते. काही विशेष इप्सिते साध्य करावयाची असल्यास या पद्धतीच्या पुजेला महत्त्व दिले जाते, असे जाणकार सांगतात. तंत्रपुजा करण्यात दादा चव्हाण यांना स्वारस्य असेल तर आश्रमात वास्तव्यादरम्यान त्यांनी तंत्रपुजा केली काय? त्यांनी पुणे मुक्कामी या पुजा केल्या काय? हटयोगाशी त्यांचा संबंध आला काय? हटयोगी साधना त्यांना आकर्षित करतात काय? हटयोगी साधना त्यांनी केल्या आहेत काय? तंत्रपुजा, हटयोग असले प्रकार चव्हाणांना प्रभावित करणारे असतील, त्यांनी त्यासंबंधिचे ज्ञान मिळविले असेल, मिळविण्याचा प्रयत्न केला असेल, तशा पुजा त्यांनी प्रत्यक्षात केल्या वा करविल्या असतील तर त्यांच्या उद्देशांची तपासणी टाळली जाऊ शकणार नाही. नरबळी प्रकरणाच्या अनुषंगाने आश्रमातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्याने चव्हाण कुटुंबियांचा उल्लेख केला होता. आश्रमातून असा उल्लेख करण्यात आल्यामुळे मुद्दा महत्वपूर्ण ठरतो. नरबळीचे जे प्रकार उघड झाले ते आश्रमात अलिकडे घडले. आश्रमात यापूर्वीही बऱ्याच संशयास्पद बाबी घडल्याचे अनेक सामान्य नागरिकांनी शासनाला निवेदनांद्वारे, तक्रारींद्वारे सांगितले आहे. आश्रमात हत्येची मालिकाच घडली असल्याचा गौप्यस्फोट सत्यशोधनाच्या आधारावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गणेश हलकारे यांनी केला आहे. मानवी मुलांच्या, मुलींच्या आयुष्याशी आश्रमात सातत्याने खेळ झाल्याचा जो आरोप वारंवार होतो आहे, त्याच्याशी पुजापाठ, अंधश्रद्धा, कर्मकांड, इप्सिते साध्य करण्याचे उद्देश या बाबींचा संबंध जुळतो. आश्रमात घडलेले अपमृत्यू कुणाच्या आशिर्वादाने घडलेत, हा खरा तपासाचा मुद्दा आहे. जुने अपमृत्यू ज्या काळात घडले त्या काळात दादा चव्हाण हे आश्रमात होते काय? ते एकटेच रहायचे की त्यांच्या परिवारातील आणखी काही लोक आश्रमात वास्तव्याला होते? असतील तर साऱ्यांचा हा डेरा आश्रमात कशासाठी? चव्हाणांना हटयोग, तंत्रपुजेत रस असेल तर अपमृत्यूंच्या काळात त्यांनी तंत्रपुजा केल्या होत्या काय? मृत झालेल्या मुला-मुलींशी दादा चव्हाणांचा संबंध आला होता काय? त्यांचे कुटुंबिय दादा चव्हाणांना ओळखतात काय? अपमृत्यूशी चव्हाणांचे संबंध जुळतात काय? या दिशेने पोलिसांना तपास करावा लागेल. चव्हाण हे एकेकाळी आश्रमातील प्रभावी व्यक्ती असल्यामुळे आश्रमात घडलेल्या धक्कादायक कृत्यांशी त्यांच्या प्रभावाचा संबंध काय, हा तपास टाळता येणार नाही.
दादा चव्हाणही तंत्रपूजेचे साधक ?
By admin | Published: September 29, 2016 12:09 AM