मनोहर मुरकुटे-अंजनगाव सुर्जी : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत दहिगाव रेचा येथील घरकुल योजनेचे ३० लाभार्थी सहा महिन्यांपासून येथील पंचायत समिती कार्यालयात चकरा घालत आहेत. त्यांचे घर तयार झाले तरी अनुदान अद्याप मिळाले नसल्याने उसनवार, व्याजाची रक्कम घेतलेले लाभार्थी शासकीय लाभाच्या प्रतीक्षेत आहेत.
शासकीय घरकुल योजनेत निवडलेल्या लाभार्थींनी उसनवार करून घर बांधकाम पूर्ण केले. परंतु पंचायत समिती कर्मचाऱ्यांकडून सहा महिन्यांपासून मस्टर काढले गेले नाही. त्यामुळे उसनवार, व्याजाने घेतलेली रक्कम चुकवायची कशी, असा प्रश्न दहिगाव रेचा येथील त्या निर्माण झाला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे या कर्मचाऱ्यांना पाठबळ असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांच्या येरझारा वाया जात आहेत.
दरम्यान, नांदगाव खंडेश्वर येथून बदली होऊन अंजनगाव सुर्जी येथे आलेले गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांनी यापुढे नागरिकांना त्रास होणार नाही, असे आश्वासन या मुद्द्यावर दिले. त्यांनी पदभार स्वीकारताच पंचायत समितीकरिता इंटरनेटची व्यवस्था करून कर्मचाऱ्यांचे कामकाज सुरळीत केले.