पथ्रोट : मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर सायंकाळी ७ च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह झालेल्या वादळी पावसाने पथ्रोट परिसरात नागरिकांचे नुकसान केले.
नागरिकांच्या घरावरील टिनपत्रयाचे छत उडून घरात पाणी शिरल्याने धान्य, अंथरूण, उपकरणांचे मोठे नुकसान झाल्यामुळे कुटुंब उघड्यावर आले. शेतातील संत्राझाडे मोडून पडली तसेच वित्च्या तारा तुटून जमिनीवर आल्या. यामुळे पथ्रोटवासीयांना रात्र अंधारात काढावी लागली.
रामापूर बु. येथील निवृत मंडल अधिकारी रामकृष्ण काटोले हे अमरावती येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेले असता, त्यांच्या घरावरील टिनाचे छत उडून धान्याचे मोठे नुकसान झाले. इंदिरानगरातील सचिन एकनाथ इंगळे यांच्या घरावरील छत उडून पाणी शिरल्याने टीव्ही, धान्य व घरातील साहित्य भिजले. महम्मदखाँ कादरखाँ यांच्या म्हशीच्या गोठ्यातील टिनाचे छत उडून जनावरांच्या चाऱ्याचे नुकसान झाले. वृत लिहेपर्यंत महसूल विभागातर्फे घटनास्थळी अधिकाऱ्यांनी भेट दिली नव्हती. पीडितांनी मदतीची मागणी केली आहे.