अनिल कडू
परतवाडा : मेळघाटच्या जंगलाला लागलेल्या आणि लागत असलेल्या आगीत होत असलेले नुकसान वन व वन्यजीव विभागाकडून आजही बैलबंडीत मोजल्या जात आहे. इंग्रजांपासून असलेली ही बैलबंडी वन विभागाने आजही कायम ठेवली आहे.
मेळघाटच्या जंगलाला काही दिवसांत मोठ्या प्रमाणात आगी लागल्या आहेत. यात हजारो हेक्टर जंगल क्षेत्र काळवंडले आहे. मौल्यवान वनसंपदा जळून खाक झाली आहे. वन, वन्यजीव व पर्यावरणीय दृष्टीने यात हानी झाली आहे.
आजही मेळघाटचे जंगल आगीत धगधगत आहे. लागलेली आग विझवायला, आटोक्यात आणायला दोन ते तीन दिवस लागत आहेत. असे असतानाही या आगीत केवळ पाला-पाचोळा, गवत जळाल्याच्या नोंदी वनविभागाच्या रेकॉर्डला नोंदविल्या जात आहेत.
आगीत झालेल्या व होत असलेल्या नुकसानीची वन, वन्यजीव व पर्यावरणीय दृष्टिकोनातून आकडेवारी मांडताना कुठलेही अधिकृत मापदंड वनविभागाकडे नाहीत. प्रत्यक्ष लागलेले आगक्षेत्र, जळालेले जंगलक्षेत्र दुर्लक्षित करून केवळ अंदाजीत आणि तेही निम्म्याहून कमी रेकॉर्डला घेतल्या जात आहे. प्रत्यक्षात जळालेले जंगल क्षेत्र व रेकॉर्डला घेतल्या जात असलेले जंगल क्षेत्र यात मोठी तफावत आढळून येत आहे. दरम्यान जेवढे हेक्टर क्षेत्र दाखविल्या गेले, तेवढ्याच बैलबंड्या पालापाचोळा, गवत जळाल्याचे दाखविण्यापर्यंत मजल गेली आहे. आगीत जळालेल्या पालापाचोळा व गवताची किंमत वनविभागाच्या नजरेत नगण्य आहे.
बॉक्स
आरोपी बेपत्ता
जंगलाला लागत असलेल्या आगी मानवनिर्मित आहेत. त्या नैसर्गिक नाहीत. असे वन व वन्यजीव विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे आग लागली की वनगुन्हा नोंदविला जातो. हा वनगुन्हा अज्ञान आरोपीविरुद्ध दाखल केला जातो. पण, या आगीच्या अनुषंगाने अज्ञात आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केलाच जात नाही. एक-दोन अपवाद वगळता आगीच्या शेकडो वनगुन्ह्यातील मुजरीम आजही बेपत्ता आहेत.