डासांची उत्पत्तिस्थाने, कुठे कूलरमध्ये पाणी, कुठे ड्रेनेज तुंबले
अमरावती : डेंग्यू व अन्य आजारांना कारणीभूत असलेल्या डासांची उत्पत्तीस्थाने म्हणजे साचून राहिलेले पाणी. त्यामुळे पाणी साचू देऊ नका, असे आवाहन जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून करण्यात येते. मात्र, स्वत:च्या दिव्याखालचा अंधार प्रशासकीय यंत्रणेला दिसत नाही, अशी स्थिती लोकमतने शुक्रवारी जिल्हा परिषदेत केलेल्या निरीक्षणात दिसून आले. यात काही विभागात कूलर सुरू असून यात डासांची पैदास निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कूलरच्या टपात पाणी साचू देऊ नका. कचरा वेळोवेळी साफ करा. अडगळीचे सामान पडू देऊ नका. यात पाणी साठवून डेंग्यूचा आजार होण्याचा धोका असतो, असे प्रशासन वारंवार सांगत आहे. डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्रशासनाने दिले. यासाठी नुकताच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नुकताच आढावा घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या. मात्र, खुद्द जिल्हा परिषदेच्या आरोग्य, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या कार्यालयात कूलरच्या टाक्यात पाणी साचून असल्याचे चित्र दिसून आले, तर बांधकाम विभागाच्या बाजूला सांडपाणी वाहून नेणारी नाल्या तुडुंब भरल्याचे दिसले. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या बाजूलाच कचऱ्याचे ढीगही तसेच पडून आहेत. ज्या ठिकाणाहून प्रशासनाचा कारभार चालतो, त्याची प्रचिती जिल्हा परिषद कार्यालयात दिसून आली.
बॉक्स
गावखेड्यात घरोघरी तपासणी, मग इकडे का नाही?
डेंग्यूचा डास सकाळी व सायंकाळच्या सुमारास डंख मारत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. एडिस इजिप्टाय या डासापासून डेंग्यू आणि चिकनगुनियाही होऊ शकतो. हा डास स्वच्छ पाण्यात होतो. आतापर्यंत कूलरच्या पाण्यात त्याची उत्पत्ती अधिक प्रमाणात झाल्याचे आरोग्य विभागाने केलेल्या निष्कर्षात पुढे आले आहे. शहरासह जिल्ह्यात काही दिवसापासून डेंग्यू रुग्णांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे संबंधित गावात सर्वेक्षणाचे काम घरोघरी सुरू आहे. असे असताना गावात सर्वेक्षण मात्र कार्यालयात कोण करणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
बॉक्स
अस्वच्छता प्रशासनाला का दिसत नाही?
जिल्हा परिषद कार्यालयात सांडपाणी वाहून नेणाऱ्या नालीमध्ये पाणी तुंबले. आजूबाजूला कचरा पडला. या दूषित पाण्यामुळे विविध संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. जिल्हा परिषद कार्यालयातील कूलरमध्ये पाणी साचले आहे. याचबरोबर अडगळीच्या साहित्यात पाणी साचून डेंग्यूचे डास वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. ज्या विभागात लगत कूलर लागले आहेत त्या कूलरमधील पाणीही कित्येक दिवसांपासून बदललेले नाही. नागरिकांना दिसणारी ही अस्वच्छता अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिसत नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.