अमरावती : लाकडी साहित्यांच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला. गुरुवारी मध्यरात्री इतवारा बाजार स्थित कडबी बाजारात ही घटना घडली. शार्ट सर्किटने ही आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात आली. अग्निशनमन दलाने तब्बल सहा तास आग विझविण्यासाठी अथक परीश्रम घेतले. या भीषण आगीमुळे इतवारा परिसरातील व्यापारी वर्ग भयभीत झाला होता. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.गुरुवारी मध्यरात्री १:३० वाजताच्या सुमारास हाजी अब्दुल हाजी सत्तार यांच्या मालकीच्या लाकडाच्या गोदामाला आग लागली. घटनेची माहिती अग्निशमनला मिळाली. या माहितीवरून अग्निशमन दलाचे उपकेंद्रप्रमुख सय्यद अन्वर, फायरमन मच्छिंद्र यादव, विलास उमेकर, योगेश ठाकरे, शिवा आडे, सुरेश पालवे, अमोल साळुंखे, अतुल कपले, मुंडे, भांदर्गे, बाठे, वाहनचालक मोहन तंबोले, आसिफ, कासम, इंगोले यांनी तत्काळ पाण्याचे बंब घेऊन घटनास्थळ गाठले. अग्निशमनने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न केले; मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे ती आटोक्यात येण्यास बरेच परिश्रम घ्यावे लागले. सात ते आठ पाण्यांचा बंबाने आगीवर मारा केल्यानंतर शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास आग नियंत्रणात आली. आग शॉर्टसर्किटने लागल्याचे गोदाममालकाने अग्निशमन विभागाला सांगितले. या आगीत लाखो रुपयांचा फर्निचरचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे.
लाकडी साहित्याच्या गोदामाला भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 10:00 PM