मनीष तसरे
अमरावती : पोलिस दलातील वाहनांचे स्टिअरिंग आता महिलांच्या हाती आले आहे. अमरावती जिल्ह्यात १३ महिला आता वाहनचालक म्हणून जिल्हा पोलिस दलातील मोटार परिवहन विभागात रुजू झाल्या आहेत. शहर पोलिस मुख्यालयात चार, तर ग्रामीण पोलिस दलात नऊ महिला कर्मचाऱ्यांचे ट्रेनिंग पूर्ण होऊन या महिला पोलिस दलाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळताना दिसत आहेत. आतापर्यंत या विभागात पुरुष मंडळीच वाहन चालक म्हणून असायची. आता या महिला चालक झाल्याने त्यांच्या कुटुंबातील सदस्यसुद्धा आनंदी आहेत.
पहिल्यांदा स्टिअरिंग सांभाळताना थोडी चिंता वाटली होती. आपण वाहन चालवू शकणार का, असेही वाटले. मात्र, आता ट्रेनिंगनंतर भीती, चिंता दूर गेल्या आहेत. आता अवजड आणि लाइटवेट असलेले वाहन या महिला सहजरीत्या चालवित आहेत. प्रत्येकालाच खाकी परिधान करता येत नाही. आम्ही खाकी परिधान करतो, त्याचा आम्हाला अभिमान आहे, असे नव्याने रुजू झालेल्या महिला चालकांनी ‘लोकमत’शी बोलताना म्हटले. आता स्वतःचा अभिमान वाटतो, असेही वाहनचालक महिला पोलिसांचे म्हणणे आहे.
पोलिस दलातील पुरुषांप्रमाणेच महिलांना देखील कर्तव्य बाजावावे लागते, असे असले तरी या आधी जिल्हा पोलिस दलात एकही महिला पोलिस वाहनाची चालक म्हणून कार्यरत नव्हती. दरम्यान, पोलिस विभागात कार्यरत आणि इच्छुक महिलांनी वाहन चालक होण्याची संधी विभागातील महिलांना उपलब्ध झाली. त्याद्वारे १३ महिला वाहन चालक पदासाठी विविध पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलिस शिपायांनी आम्हाला वाहन चालक व्हायचे आहे आणि काही तरी वेगळे करायचे आहे, असं चॅलेंज त्यांनी स्वीकारले. यासाठी स्वखुशीने जिल्हा पोलिस मोटार परिवहन विभागात अर्ज सादर केला आणि या सर्व महिलांचे खंडाळा येथे चालक प्रशिक्षण केंद्र येथे साडेसात महिन्यांचे ट्रेनिंग पूर्ण झाले. आता मात्र या सर्व महिला मोटार परिवहन विभागात रुजू झाल्या आहेत.
'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रीद वाक्याप्रमाणे अमरावती ग्रामीण व पोलिस आयुक्तालय शहर या सर्व महिला चालक म्हणून खंडाळा येथे साडेसात महिन्यांची कौशल्य चाचणी पार करून पोलिस दलाचा अभिमान वाढविण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.