अमरावती : दर्यापूरच्या एसडीओ प्रियंका आंबेकर यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियम ४ (१) (अ) मधील तरतुदीनुसार निलंबित करण्यात आले. निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय राहणार आहे. तसे आदेश महसूल विभागाचे अवर सचिव अ.ज. शेटे यांनी गुरुवारी बजावले.
आंबेकर यांनी त्यांच्या कार्यकाळात सन २०१८ ते २०२० मोठ्या प्रमाणात नियमबाह्य कारभार चालविला होता. याविषयी ‘लोकमत’ने वृत्तमालिका जनदरबारात मांडली होती. याची जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गंभीर दखल घेत उपजिल्हाधिकारी मनीष गायकवाड यांच्या नेतृत्वात पाच सदस्यीय निरीक्षण पथक गठित केले होते. या पथकाच्या अहवालात आंबेकर यांच्याद्वारे झालेली अनियमितता उघडकीस आली व हा अहवाल पथकाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. यावर जिल्हाधिकाऱ्यांद्वारे प्रियंका आंबेकर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांना सादर करण्यात आला होता. त्यांनी तो शासनाकडे पाठविला. गुरुवारी निलंबनाचे आदेश धडकले.