दर्यापूर : येथील राजदीप ज्वेलर्समधून ४० ते ५० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याच्या वृत्ताने मोठी खळबळ उडाली होती. स्थानिक पोलिसांसह एलसीबीचे कानही टवकारले होते. मात्र, तूर्तास त्या घटनेत ४.४४ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे.
शहरातील बनोसास्थित राजदीप ज्वेलर्स येथून अज्ञात चोराने गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास सोने असलेली बॅग लंपास केली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोर दोन साथीदारांसोबत दुचाकीवर पळून जाताना दिसला. राजदीप ज्वेलर्सच्या संचालकांनी गुरुवारी पोलीस तपासा दरम्यान चोरी गेलेल्या बॅगेत अंदाजे ४० ते ५० लाखांचे सोन्याचे दागिने असल्याचे सांगितले होते. मात्र, सायंकाळी तक्रार दाखल करतेवेळी त्यांच्याजवळील सोन्याच्या पावत्यांच्या आधारे त्यांनी १४९ ग्रॅम ३५५ मिली सोन्याचे दागिने व ४० हजार रोख असा ४ लाख ४४ हजार ४७९ रुपयांचा मुद्देमाल चोरी गेल्याचे तक्रारीत नमूद केले. राजदीप ज्वेलर्सचे संचालक दीपक पुंडलिक प्रांजळे (५३, रा. खोलापुरी गेट, दर्यापूर) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध भादंविचे कलम ३८० अन्वये गुन्हा नोंदविला. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा व दर्यापूर पोलीस संयुक्तपणे करत आहेत.
कोट :-
सोन्याच्या पावत्यांच्या आधारे पोलिसांनी १४९ ग्रॅम सोने चोरी गेल्याची नोंद घेतली. मात्र तिजोरीत आणखी काही पावत्या आहेत. तिजोरीची चावी चोरी गेलेल्या बॅगेत होती. तिजोरी उघडल्यानंतर सोन्याच्या पावत्या पोलिसांकडे जमा करेन.
- दीपक प्रांजळे, संचालक राजदीप ज्वेलर्स