अमरावती : अवकाळी पावसाने नुकसान झाल्यानंतरही महसूल विभागाने तिवसा तालुक्यातील पिकांचे पंचनामे केले नाहीत. त्यामुळे तालुका शासन मदतीपासून वंचित राहिला आहे. याच्या निषेधार्थ प्रहारद्वारा संजय देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी आत्महत्या केलेल्या वऱ्हा येथील शेतकऱ्याची दशक्रिया करून निषेध नोंदविण्यात आला.
नोव्हेंबरअखेरीस झालेल्या अवकाळी पावसाने तिवसा तालुक्यातील खरीप, रब्बी, भाजीपाला व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वेचणी राहिलेला कापूस बोंडातच भिजला. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला. अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचा आदेश असतानाही महसूल व कृषी प्रशासनाने बाधित भागाचे पंचनामे केले नाहीत, त्यामुळे शासनाला अहवाल गेलेला नाही. परिणामी, नुकसान झाल्यावरही तालुका शासन मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
नापिकीला कंटाळून वऱ्हा येथील शेतकरी राजू चर्जन याने आत्महत्या केलेली आहे. त्यामुळे प्रहारद्वारा मंगळवारी या शेतकऱ्याची दशक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयाचे परिसरात करण्यात आली. यावेळी योगेश लोखंडे, बाबाराव ठाकरे, अंकुश गायकवाड, सतीश गावंडे, अशोकराव लांजेवार, पंकज चौधरी, प्रवीण केणे, रवी पाथरे, नरेंद्र काकडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.