अथक परिश्रम, अखंड शैक्षणिक प्रवास, कर्करोगावर करतेय संशोधन
धामणगाव रेल्वे : जुना धामणगावच्या एका गरीब कुटुंबातील भाजीविक्रेत्याच्या मुलीने अथक परिश्रम व अखंड शैक्षणिक प्रवास करीत थेट अमेरिकेत पाऊल ठेवले आहे. आज ती वॉशिंग्टनमध्ये अधिकारी बनली आहे. तेथे सहायक संशोधक अधिकारी म्हणून ती कर्करोगावर संशोधन करीत आहे.
अतिसामान्य कुटुंबात जन्मलेली सपना हिची घरची परिस्थिती बेताची. आई वडील अशिक्षित. वडील भाजीविक्रेते, तर आई शेतमजूर. सपनाने प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत पूर्ण केले. दहावी बाभूळगाव तालुक्यातील कोटांबा येथून व बारावी सायन्स आदर्श महाविद्यालय धामणगाव रेल्वे येथून पूर्ण केले. बाबासाहेबांचे उच्च विचार सोबतीला होतेच व शिक्षणाचा ध्यास घेऊन सपनाने यवतमाळ येथून बी फार्मचे शिक्षण पूर्ण केले. एम. फार्मसाठी सरकारी कोट्यातून तिची मोहाली (पंजाब) येथे निवड झाली. तिने तेथे सुवर्णपदक प्राप्त करून एम. फार्मचे शिक्षण पूर्ण केले.
संस्थेतर्फे हैदराबाद येथे तिचा पीएचडीसाठी प्रवेश झाला. तिला ४५ हजार रुपये महिना स्कॉलरशिप मिळत होती. पैकी ३० हजार रुपये सपना दरमहा वडिलांना जुना धामणगाव येथे पाठवीत होती. सपनाची पीएचडी होताच तिची निवड अमेरिकेतील एका प्रतिष्ठित स्कूल ऑफ मेडिसिन सेंट लुईस वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी प्रोफेसर पदावर झाली. आज ती संशोधन अधिकारी म्हणून कर्करोगावर अभ्यास करीत आहे. गरिबीमुळे शिक्षण टाळणाऱ्यांसाठी सपनाची शैक्षणिक मजल समाजाला प्रेरणादायी ठरल्याशिवाय राहणार नाही. सपनाची आई अष्टशीला, मोठी बहीण सोनू व लहान बहीण संध्या तसेच लहान भाऊ संदेश यांचे प्रयत्न सपनाला अधिक ऊर्जा देत आहे.