कंत्राटदारावर रोष : महापालिका आयुक्तांना ऐकविली हकिकतबडनेरा : बडनेऱ्यातील प्रभाग क्र. ४२ सोमवार बाजार येथील सफाई कंत्राटदारांच्या अरेरावीला कंटाळून तसेच मजुरी कमी देत असल्याचा आरोप करून सफाई कामगारांनी मंगळवारी कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे या प्रभागात दैंनदिन सफाईचा बोजवारा उडाला असून सफाई कामगारांनी आयुक्तांची भेट घेऊन वस्तुस्थिती कथन केली.आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची भेट घेऊन सफाई कामगारांनी कंत्राटदारांमार्फत कामगारांची होत असलेल्या शोषणाबाबत वस्तुस्थिती सांगितली. रेकॉर्डवर जास्त कामगार दर्शवून कमी मनुष्यबळाच्या आधारे सफाई केली जाते. एवढे नव्हे तर १९० रुपयांपेक्षा जास्त कधीही कामगारांना मजुरी दिली जात नाही, असे आयुक्तांना सफाई कामगारांनी सांगितले. गत १२ वर्षांपासून सफाई कामगार कार्यरत असूनही त्यांना कोणत्याही सोईसुविधा मिळत नसल्याचे आयुक्तांना सांगितले. बडनेरा नवीवस्तीत सोमवार बाजार प्रभाग या प्रभागात आठवडी बाजार असून अतिरिक्त सफाई कर्मचारी देखील नेमण्यात आले आहेत. मात्र या १ डिसेंबरपासून नवीन कंत्राटी पद्धतीने दैनंदिन सफाई सुरू झाली आहे. कामगारांना कंत्राटदाराकडून कमी मजुरी मिळत असल्याने कामबंद आंदोलन करून प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब सफाई कामगारांनी आणून दिली. महापालिका प्रशासनाने ठरवून दिलेल्या दरानुसारच मजुरी द्यावी तसेच कामगारांवर होणारा अन्याय दूर करण्यात यावा, अशी मागणी सतीश स्वर्गे, ज्ञानेशवर तायडे, सचिन हिवराळे, रुपेश मळकम, कमल गौतेल, प्रवीण गवई, मुकेश ताटे, रोशन करीयार, गणेश बकसरे, टिलवा परिहार, कैशास माथो, अरुण सहारे, लक्ष्म ढबाळे आदी सफाई कामगारांनी निवेदनातून केली. (शहर प्रतिनिधी)
बडनेऱ्यात दैंनदिन सफाई कामगारांचे कामबंद आंदोलन
By admin | Published: December 02, 2015 12:16 AM