लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कायम सोबत करणाऱ्या आपल्या सावलीनेच साथ सोडल्याचा अनुभव येत्या २५ मे रोजी अमरावतीकर घेणार आहेत. या दिवशी दुपारी १२ वाजून ३० मिनिटे आणि ४ सेकंद होताच, पुढील ५२ सेकंदांकरिता सावली आपली साथ सोडेल. ‘झीरो शॅडो डे’ अर्थात शून्य सावली दिनी या अद्भुत खगोलीय घटनेचा अनुभव सर्वांना घेता येईल.कर्कवृत्त आणि मकर वृत्त या दोन वृत्तांमध्ये राहणाºया लोकांना वर्षातून दोन वेळेला हा शू्न्य सावलीचा अनुभव घेता येतो. कर्कवृत्त, मकर वृत्त आणि विषुववृत्त या वृत्तावरती राहणाºया लोकांना वर्षातून एकदाच शून्य सावलीचा अनुभव घेता येतो. मात्र, कर्कवृत्ताच्या वरच्या भागात व मकर वृत्ताच्या खालच्या भागात राहणाºया लोकांना या शून्य सावलीचा आनंद घेता येत नाही.आपली पृथ्वी ज्या अक्षाभोवती फिरते, तो २३.५ अंशाने कलला आहे. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या मार्गाला आयनिक वृत्त असे म्हणतात. पृथ्वी ही कर्कवृत्तावरून बरोबर तीन महिन्यांनी वसंत संपात बिंदूपाशी येते. या दिवशी १२ तासांची रात्र आणि १२ तासांचा दिवस असतो, तर सूर्याची किरणे विषुववृत्तावरती वरून पडतात. यामुळे विषुववृत्तावर कुठेही आपण उभे राहिलो तरी काही काळासाठी आपली सावली गायब होते. यानंतर बरोबर तीन महिन्यानंतर मकर वृत्तावर, तीन महिन्यांनी परत विषुववृत्तावर आणि नंतर पुन्हा तीन महिन्यानंतर कर्कवृत्तावर शून्य सावलीचा आनंद घेता येणार आहे. पृथ्वीवर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडच्या भागात, तर कर्क वृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. तो सदैव क्रमश: उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडेच दिसतो. पण या दोन टोकांच्या वृत्तामधल्या लोकांना मात्र वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्यावर आलेला अनुभवयाला मिळतो. जेव्हा सूर्य बरोबर डोक्यावर असतो तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते आणि जणू काही ती सावली गायब होते. मरेपर्यंत कायम सोबतीला असलेली सावली ही अचानक ‘शून्य सावली’ झाल्याचा रोमांचकारी अनुभव अमरावतीकरांनी जरूर अनुभवावा, असे आवाहन खगोलतज्ज्ञांनी केले आहे.
२५ मे रोजी ‘शून्य सावली’चा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 11:47 PM
कायम सोबत करणाऱ्या आपल्या सावलीनेच साथ सोडल्याचा अनुभव येत्या २५ मे रोजी अमरावतीकर घेणार आहेत. या दिवशी दुपारी १२ वाजून ३० मिनिटे आणि ४ सेकंद होताच, पुढील ५२ सेकंदांकरिता सावली आपली साथ सोडेल.
ठळक मुद्देझीरो शॅडो डे : नागरिकांना अनुभवता येणार