अमरावती: धारणी मार्गावरील वझ्झर येथील सपन प्रकल्पात गुरुवारी सकाळी पती-पत्नीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. चिखलदरा तालुक्यातील चिचखेडा येथील हे जोडपे मंगळवारी दुपारपासून दुचाकीने घरून निघाले होते.
विकी मंगलदास बारवे (२३) व तुलसी विकी बारवे (२१, रा. चिचखेडा) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. विकी हा ट्रॅक्टरवर चालकाचे काम करत होता. त्याला वडील नसून आई व भाऊ मध्य प्रदेश येथे गावातीलच नातेवाइकाचे लग्न असल्याने तिकडे गेले होते. त्यानंतर विकी व तुलसी हे घराला कुलूप लावून निघाले. दोन दिवसांपासून ते गावातून बेपत्ता होते. प्राथमिकदृष्ट्या दोघांनी आत्महत्येचा केल्याचा अंदाज आहे. तथापि पोिलस मृत्यूच्या कारणांचा तपास घेत आहेत. घटनास्थळी दुचाकी आढळून आली असून दोघेही दुचाकीने आल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलिस पाटलाची पोलिसांना माहिती
चिचखेडा येथील रेशन दुकानदार तथा मुलीचे वडील सायबू उमरकर यांनी मुलगी व जावई दोन दिवसांपासून घरी नाहीत व त्यांचे मोबाइल बंद येत असल्याची माहिती पोलिसपाटील बब्बू अजनेरिया यांना दिली. त्यांनी चिखलदरा पोलिसांना याची माहिती कळविली.
दोघांचा प्रेमविवाह
विकी व तुलसी दोघेही चिचखेडा गावातील रहिवासी व एकाच समाजाचे आहेत. दोघांचे प्रेम होते. समाजबांधवांनी त्यांचे गतवर्षी सर्वसंमतीने लग्न लावून दिले होते.
मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांना दिसला मोबाइल
सपन धरण प्रकल्पाकडे मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या काही पुरुष व महिलांना बंद असलेला मोबाइल आढळून आला. तो ऑन केल्यावर पोलिसपाटील बब्बू अजनेरीया यांनी त्यावर संवाद साधला. प्रकल्प स्थळावरील चौकीदारांनी पोलिसांना कळवले.
घटनास्थळी दुचाकी व दोघांचे मृतदेह आढळून आले. चिखलदरा तालुक्यातील चिंचखेडा येथील दोघे मृत आहेत. घटनेचा संपूर्ण तपास सुरू आहे.
- संदीप चव्हाण, ठाणेदार, परतवाडा