लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : स्थानिक पांढुर्णा मार्गावरील शिक्षक कॉलनी लगतच्या शिवारातून रविवारी बेपत्ता झालेल्या अजय कैलास पंधरे या चिमुकल्याचा मृतदेह तब्बल पाच दिवसानंतर शुक्रवारी एका बंद कारमध्ये आढळून आला.आई-वडील शेतमजुरीस गेल्यानंतर ५ मे रोजी सकाळी ८.३० ते ९.३० या कालावधीत सात वर्षीय अजय हा शेतातील झोपडीतून बेपत्ता झाला होता. शोध घेतल्यानंतर सोमवारी अजयच्या अपहरणाची तक्रार त्यांनी वरूड पोलिसांत नोंदवली. पोलिसांनाही त्याचा शोध लागला नाही.दरम्यान, लगतच्याच श्रीसाईराम वॉशिंग सेंटरच्या बाजूला नादुरुस्त कारमधून दुर्गंधी येत असल्याने काही नागरिकांनी जाऊन पाहिले. एम.एच. ०१ व्ही.ए ४३४९ क्रमांकाच्या या कारमध्ये अजयचा मृतदेह आढळला. वरूड पोलिसांनी न्यायवैद्यक प्रयोगशाळा पथक तसेच ठसेतज्ज्ञांना पाचारण करून घटनास्थळीच उत्तरीय तपासणी करवून घेतली. ती कार आणि मृत अजयच्या घराचे अंतर हे १०० मीटरचे आहे. खेळता-खेळता कारजवळ आला; मात्र, आत गेल्यावर कारची दारे त्याला उघडता आली नाही. त्यात गुदमरून त्याचा मृत्यू झाला, अशी प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तविली. त्याला कुणी पळवून नेले असावे का, याही दिशेने तपास केला जात आहे.अजय पंधरे याचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच ठाणेदार दीपक वानखडे , उपनिरीक्षक प्रिया उमाळे , जमादार गजानन गिरी, उमेश ढेवले, संदीप वंजारी, शेषराव कोकरे, अरविंद गिरी, अशोक संभे, स्वप्निल काकडे, सागर लेवलकर, चालक तायडे, वैशाली सरवटकर, सोनल खानळे हा पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला.पालकांचा टाहो : बंद कारमध्ये गुदमरुन मृत्यू?पोलिसांची अंत्यसंस्काराला मदतएकुलत्या मुलाच्या पार्थिवापुढे कैलास पंधरे व त्यांच्या पत्नीचा टाहो हृदयद्रावक होता. त्यांची स्थिती पाहून ठाणेदार दीपक वानखडे व जयभवानी आश्रमशाळेकडून अजयच्या अंत्यसंस्कारासाठी आर्थिक मदत देण्यात आली.
‘त्या’ चिमुकल्याचा मृतदेहच सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 1:13 AM